Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
वर्धा- तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक को -ऑपरेटिव्ह सोसायटी ही राज्यातील महिलांद्वारे सौर पॅनल निर्मिती करणारी एकमेव को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहे. महिलांद्वारे चालविल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या तांत्रिक उद्योगाला चालना देण्यासाठी आणि महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या उत्पादनाची मेडाअंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना राज्यातील अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पात सहभागी करून घेण्याचे निर्देश पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी दिलेत.
वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावातील मागासवर्गीय महिलांद्वारे सोलर पॅनल निर्मिती केली जाते. उमेदच्या महिला बचतगटांनी एकत्र येऊन 2018 मध्ये को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आय. आय. टी. मुंबईच्या माध्यमातून महिलांना तांत्रिक सहकार्य उपलब्ध करून देऊन या उद्योगाला जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी सुद्धा दिला होता. महिलांनी राजस्थान मधील डुंगरपूरच्या दुर्गा सोलर एनर्जी कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतले. या उद्योगात 214 महिलांचा समभाग असून यातील 40 महिला सोलर पॅनल निर्मिती करण्यात तरबेज झाल्या आहेत. तसेच इतर महिला पॅनलची उभारणी, मार्केटिंग आणि लेखा विभागाचे कामकाज सांभाळतात. या सर्व महिला तांत्रिकदृष्ट्या एखाद्या अभियंत्याप्रमाणे काम करतात.
#solapurcitynews