fbpx
chandrapur health review 750x375 1 आणीबाणीच्या परिस्थितीसाठी चारशे बेडच्या जंबो कोविड हॉस्पिटलचा प्रस्ताव तयार करा : पालकमंत्री

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
चंद्रपूर- कोरोना संक्रमणाचा सर्वोच्च कालावधी पुढे येऊ शकतो. अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये उपचारासाठी रुग्णालयात जागाच नाही. अशी स्थिती चंद्रपूरमध्ये होऊ नये यासाठी 300 ते 400 बेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसनमंत्री  विजय वडेट्टीवार यांनी दिले. ध्वजारोहणानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील वैद्यकीय यंत्रणेची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत व आरोग्य यंत्रणेतील सर्व प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये अनेक शहरात पुन्हा एकदा लॉक डाउन करण्याची परिस्थिती येऊ शकते. जिल्ह्यामध्ये घुग्घुस, बल्लारपूर, गोंडपिंपरी याठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असून तातडीने लॉक डाऊन करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सोमवारपासून याबाबत नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना देखील त्यांनी या शहरामधील लॉक डाऊन अतिशय कडक होईल याकडे लक्ष वेधण्याचे सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस ग्रामपंचायतमध्ये रविवार दिनांक 16 ऑगस्ट पासून रात्री आठ वाजल्यापासून 20 ऑगस्ट रात्री 12 वाजे पर्यंत सर्व किराणा दुकान सर्व किरकोळ व ठोक विक्रेते सह व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने आस्थापना संपूर्णता बंद राहतील असे त्यांनी स्पष्ट केले. बल्लारपूर शहरातील रुग्णसंख्या शंभराच्या वरती पोचली आहे. त्यामुळे सोमवार 17 ऑगस्ट पहाटेपासून 21 तारखेपर्यंत बल्लारपुर बामणी बंद राहणार आहे. गोंडपिंपरी शहरात कोरोनाने शिरकाव केला आहे. 16 ऑगस्टपासून 22 तारखेपर्यंत लॉक डाऊन पाडण्यात येणार आहे. गोंडपिंपरी शहरात 21 व  22 तारखेला फक्त जीवनावश्यक सेवा देण्यासाठी नऊ ते दुपारी दोन या कालावधीत दुकाने सुरू असतील. कोरोना संसर्गाचा काळ वाढत असल्यामुळे नागरिकही एकीकडे त्रस्त झाले आहेत. मात्र अशावेळी कोरोना आजाराला गृहीत धरणे देखील योग्य ठरणार नाही. त्यामुळे येत्या काळात शारीरिक अंतर राखणे, मास्कचा वापर करणे, गरज नसताना बाहेर न पडणे, याकडे लक्ष वेधण्याचा आवाहनही त्यांनी केले. यासाठी पोलिसांनी आणखी सक्त व्हावे, तसेच प्रत्येक नाक्यावरची चौकशी वाढवावी, तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडरची गरज भासू शकते. त्यामुळे चंद्रपूर शहरात ऑक्सिजन जनरेशन प्लाँट सुरू करण्याची चाचपणी ही या बैठकीत करण्यात आली. यासंदर्भात तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा व तसेच आवश्यक असणारे तीनशे ते चारशे बेडचे रुग्णालय नव्याने निर्माण होत असलेले मेडिकल कॉलेज परिसर चांदा क्लब किंवा पोलीस ग्राउंड परिसर यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक उपयुक्त राहील, या संदर्भातही सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यामध्ये किती बेड सध्या उपलब्ध होऊ शकतात व जिल्ह्यांमध्ये नेमके किती ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे. याची माहिती घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील सध्याची स्थिती व पुढील दोन महिन्यातील स्थिती लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत मृत झालेल्या कोरोना आजारातील बहुतांश बाधित हे अन्य आजाराने त्रस्त होते. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या दहा बाधितांपैकी केवळ एक अपवाद वगळता अन्य सर्व बाधित हे कोरोना लागण झाल्या सोबतच गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे शहरांमध्ये व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्याबाबत ही यावेळी त्यांनी निर्देश दिले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी देखील यावेळी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील सोयी सुविधा वाढविण्याबाबत व स्थानिक स्तरावरील नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने निकाली लावण्याचे निर्देश अधिष्ठाता एस.एस. मोरे यांना दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्तीसंदर्भात कारवाई सुरू करण्याबाबतचेही निर्देश दिले.
#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update