बीड- कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय कारखान्याचा धुराड यंदा पेटू देणार नाही व कराराच्या अंतरिम वाढीसह ऊसतोड कामगारांना मजुरीत १५०% वाढ केल्याशिवाय यंदा कारखान्याचे चाक फिरु देणार नाही, असा इशारा सुरेश धस यांनी दिला आहे. ऊसतोड कामगारांच्या संघटनांच्या या मागणीला माझा पाठिंबा आहे, असे आमदार धस म्हणाले.
ऊसतोडणीत पैसा मिळत नसल्याने तो दुसरीकडे जात आहेत. या कारणांमुळे मुकादमांच्या संसाराचे वाटोळे झालं आहे. 18.5 टक्के कमिशनवर भागत नाही. 3 रुपये, 4 रुपये शेकड्याने व्याजाचे पैसे घेतल्याने यात व्यावहारिकता जाणवत नाही. अनेक मुकादम यामुळे व्यसनाधीन झालेले आहेत. अनेकांनी आपली जीवनयात्र संपवली आहे, त्यामुळे ही भाववाढ झाली पाहिजे, असं सुरेश धस म्हणाले. करार तीन वर्षाचाच असला पाहिजे, पाच वर्षाचा चालणार नाही. तर टीडीएस हा ऊसतोड कामगारांकडून कपात केला जाता कामा नये. अनेक कारखान्यांनी असे उद्योग केलेले आहेत. तसेच 100 टक्के शौचालयाची सोय केल्याशिवाय कुठल्याही कारखान्याला साखर आयुक्तांनी गाळप परवानगी देऊ नये. शौचालयाची सोय नसल्याने महिलांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होते. अनेक महिलांना यामुळे किडनी स्टोनचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे.