Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सांगली- कोविड मुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदि उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करावी. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत तपासणीसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास नागरिकांनी सत्य ती सर्व माहिती द्यावी, कोणतीही माहिती लपवू नये. कोरोनाची काही लक्षणे असल्यास अथवा काही त्रास होत असल्यास तात्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत. कोणीही दुखणे अंगावर काढू नये. सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. नेहमी मास्कचा वापर व हात वारंवार धुवावेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी या बाबी कटाक्षाने पाळाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, बिलांचे व उपचाराचे ऑडिट करण्याच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच हॉस्पीटलबाहेर दरपत्रक लावण्याबरोबरच रूग्णांच्या नातेवाईकांना रूग्णांबाबत वेळोवेळी माहिती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.