गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ बैठकीत पालकमंत्र्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
नाशिक- जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून जात असते; हे जाणारे पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा तसेच महाराष्ट्रातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते महाराष्ट्रात कसे राहील याकडे लक्ष देण्यात यावे; अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भुजबळ फार्म येथे झालेल्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस माजी खासदार समीर भुजबळ, येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नाशिक मुख्य अभियंता अलका अहिरराव, अहमदनगर मुख्य अभियंता अरुण नाईक, धुळे अधीक्षक अभियंता आमले, ऊर्ध्व गोदावरी कार्यकारी अभियंता राहुल पाटील, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नांदूर मध्यमेश्वर कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्राधान्याने ते पूर्ण करा जेणेकरून त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होईल. यामध्ये मांजरपाडा सह प्रवाही वळण योजनांसाठी प्राधान्य देण्यात यावे, आणि त्यानुसार उर्वरित इतर योजनांची मांडणी करण्यात यावी असे निर्देश भुजबळ यांनी दिले.
तेलंगणास्थित कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील प्रकल्पांचा आराखडा सादर करण्यात यावा तसेच जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांसाठी सौर ऊर्जेचा वापर अधिकाधिक कसा करता येईल याकडे लक्ष ठेवण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. सिन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ प्रकल्पाचे काम हाती घेण्यात यावे यासोबतच नदीजोड प्रकल्पासाठी मुख्य अभियंता या स्वतंत्र पदाची निर्मिती विचाराधीन असून त्याचे कार्यालय नाशिक येथे निर्माण करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.