Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
अमरावती- मेळघाटातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आदी दुरुस्ती कामांतील परवानगी प्रक्रियेचा अडथळा दूर झाला आहे. ही नित्याची दुरुस्ती कामे असून, त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इतर एजन्सीला कुठेही प्रतिबंध करू नयेत, असे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी वन प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच इतर एजन्सीकडून मेळघाटातील जंगलातून जाणा-या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम जंगलाबाहेरून माती, खडी व इतर साहित्य आणून केले जाते. ते रुटिन मेटेनन्सचे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक काम आहे. त्यामुळे अशा कामांना परवानगी प्रक्रियेचा अडथळा असता कामा नये. खड्डे बुजविणे व रस्तेदुरुस्तीची कामे करणा-या एजन्सी जंगलाबाहेरून दुरुस्ती साहित्य आणत असल्याने या कामांना कुठलाही अडथळा येऊ नये, असा निर्णय या बैठकीत झाला. याबाबतच वन प्रशासनाला आदेशही नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयाने जारी केले आहेत. वनविभागाच्या परवानगीअभावी अनेक दिवसांपासून रस्तेदुरुस्तीला अडथळे येत होते. या निर्णयामुळे रस्तेदुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच ही कामे पूर्ण केली जातील. त्याशिवाय, मेळघाटातील रस्त्यांच्या सुविधेसाठी व इतर नियोजित कामांसाठी आवश्यक परवानग्यांबाबत नियमित पाठपुरावा केला जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.