fbpx
2 1 750x375 1 प्रत्येक नागरिकाने ‘कोरोना’प्रतिबंधाचा निर्धार करावा! – पालकमंत्री अब्दुल सत्तार

धुळे शहरातील चौकाचौकात जाऊन पालकमंत्र्यांनी साधला नागरिकांशी संवाद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

धुळे धुळे जिल्ह्यासह जगभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. हा विषाणू डोळ्यांनाही दिसत नाही. या विषाणूमुळे जगात आतापर्यंत 8 लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना प्राणास मुकावे लागले आहे. धुळे जिल्ह्यातही रुग्ण संख्या वाढत आहे. एवढेच नव्हे, तर या विषाणूचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. या दुर्धर संकटातून सुखरूपपणे बाहेर पडलो आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने या कोरोना विषाणूचे गांभीर्य समजून घेत त्याच्या प्रतिबंधासाठी नियमितपणे मास्क वापरावा, अनावश्यक गर्दी टाळावी आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

              पालकमंत्री सत्तार हे गेले दोन दिवस धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. या कालावधीत त्यांनी पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधला. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी (ता. 26) जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे त्यांना आवाहन केले. त्यानंतर कोरोना विषाणू, गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी संवाद साधला. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या नियमांचे पालन करीत नागरिकांनी उत्सव साजरे करावेत, असे आवाहन यावेळी केले. त्यानंतर पालकमंत्री यांनी धुळे शहरातील प्रमुख चौकात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी तिरंगा चौक, महात्मा गांधी पुतळा, शंभर फुटी रोड, देवपुरातील दत्तमंदिर परिसरात जाऊन थेट लोकांशी संवाद साधला. यावेळी आमदार मंजुळा गावित, आमदार डॉ. फारुक शाह, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            पालकमंत्री सत्तार यांनी आपल्या मनोगतात सांगितले, कोरोना विषाणूमुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वंकष प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींचे सहकार्य आवश्यक आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींसमवेत सविस्तर चर्चा झालेली आहे. आता थेट नागरिकांशी संवाद व्हावा म्हणून आपण प्रमुख चौकात सभा घेत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणू जात, धर्म, स्त्री, पुरुष, लहान- मोठा असा कोणताच फरक करीत नाही. या आजारावर अद्याप खात्रीशीर लस उपलब्ध नाही. जगभरातील संशोधक या आजारावर लस शोधण्यासाठी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने आपला परिवार सुरक्षित ठेवण्यासाठी, घरातील लहान मुले, वृध्द व्यक्तींच्या सुरक्षेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तसे केले, तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

               नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर केला पाहिजे. अत्यावश्यक काम असेल, तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडल्यावर सोशल डिस्टन्स ठेवले पाहिजे. हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझर लावावे. राज्य शासन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना आपण सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत विविध सण, उत्सव नागरिकांनी राज्य शासनाच्या नियमांचे पालन करीत साजरे केले आहेत. यापुढील काळातही केंद्र सरकार, राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सहकार्य करावे, असेही आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले.

                यावेळी आमदार श्रीमती गावित, आमदार डॉ. शाह यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनीही राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना अंमलात आणाव्यात, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर औषधोपचार करण्यात येत आहेत. पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील स्कॅनिंगची यंत्रणा लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. तसेच प्रयोगशाळेची नमुने तपासणीची क्षमता दुप्पट करण्याचे नियोजन सुरू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले. पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी जिल्ह्यात पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या बंदोबस्ताची, तर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेख यांनी महानगरपालिकेतर्फे कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update