Solapur City News ● Facebook ● Facebook Page ●Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- भोर विधानसभा मतदार संघातील (जि. पुणे) विजेचे विविध प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील तसेच दुर्गम, अतिदूर्गम भागासह इतर ठिकाणची वीज वितरण यंत्रणेचे जाळे आणखी विस्तारित व सक्षम केले जाईल अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी आज दिली. मुंबई येथील महावितरणच्या मुख्यालयात भोर विधानसभा मतदार संघातील विविध प्रश्न, नवीन उपकेंद्र व वीज यंत्रणेचे सक्षमीकरण आदी मुद्द्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भोरचे आमदार श्री. संग्राम थोपटे, महावितरणचे संचालक दिनेश साबू, महापारेषणचे संचालक श्री. संजय ताकसांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भोर तालुक्यामध्ये वीज वाहिन्यांची लांबी जास्त असल्याने कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी नवीन वीज उपकेंद्र उभारणे, जीर्ण झालेले वीजखांब बदलणे आवश्यक आहे. याशिवाय अतिभारित रोहित्रांची क्षमता वाढ करण्यासोबतच मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीला याेजनेला गती देणे आदी मुद्दयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात तसेच विजेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात असे आदेश ऊर्जामंत्री डाॅ. राऊत यांनी यावेळी दिले. तसेच प्रलंबित कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आली.
सध्या महावितरणचा भोर उपविभाग हा बारामती परिमंडलाच्या कार्यक्षेत्रात आहे. मात्र वीजग्राहकांच्या दृष्टीने गैरसोयीचे असल्याने भोर उपविभाग हा पुणे परिमंडलामध्ये समाविष्ट करावा अशी मागणी आमदार संग्राम थोपटे यांनी केली. याबाबत अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डाॅ. राऊत यांनी पुणे प्रादेशिक संचालकांना दिले. या बैठकीला व्हीडीओ काॅन्फन्सिंगद्वारे पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे (बारामती), श्री. सचिन तालेवार (पुणे) आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होते.