Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम लोकचळवळ करणार : पालकमंत्री अब्दुल सत्तार
धुळे- ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्याची स्थिती समजण्यास मदत होईल. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य साक्षरता वाढवायची आहे. त्यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक आहे. लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी नाशिक विभागातील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास, खार विकास जमिनी, बंदरे आणि विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, कोरोनाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, डॉ. अरुण मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. अरुण मोरे, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून राज्याचे आरोग्यमान कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाचे पथक प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्याची तपासणी करेल, असे नियोजन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक विभागाचे काम योग्य दिशेने सुरू आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना शारीरिक अंतर ठेवावे. हात नियमितपणे साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ करावेत. या गोष्टी आता प्रत्येकाने अंगवळणी पाडून घ्याव्यात.
कोरोना बाधित काही रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्यात येते. अशा व्यक्तींवर आरोग्य प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे. जेणेकरून कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडणार नाही. तसेच कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा बसण्यास मदत होईल. नागरिकांनीही कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसून आली, तर तत्काळ रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम लोकचळवळ करणार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेत धुळे जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिक सहभागी करून घेत या मोहिमेला लोकचळवळ करण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले. ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे कोरोना विरोधातील लढ्याला बळ मिळाले आहे. कोरोना विरोधातील लढ्यात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यादव, पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांच्या समवेत धुळे शहरात गेल्या महिन्यात ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या. धुळे जिल्हा प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. ती पूर्णपणे आटोक्यात आणून धुळे जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, असेही त्यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यात 871 पथके करताहेत तपासणी
जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत धुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 871 पथके गठित करण्यात आली आहेत. या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. आतापर्यंत 11 लाख 40 हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी स्थानिक बोलीभाषा अहिराणीतून जिंगल्स तयार केल्या असून स्थानिक लोककलांच्या माध्यमातूनही या मोहिमेची जनजागृती करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट कमी झाला असून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 90 पर्यंत पोहोचली आहे. पालकमंत्री महोदय धुळे जिल्ह्यातील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेतात, असेही त्यांनी सांगितले.