Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- राज्याला लवकरात लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेतली आहे. सर्वांच्या सहभागातून मुंबई उपनगर जिल्ह्यात ही मोहीम अधिक गतिमान करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पालकमंत्री ठाकरे यांनी या मोहिमेच्या अनुषंगाने आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयात दुसरी आढावा बैठक घेतली. बैठकीस जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह उपनगर जिल्ह्यातील महापालिका उपायुक्त, सर्व १५ वॉर्डांचे सहायक आयुक्त यांच्यासह आरोग्य, आयसीडीएस, सहकार आदी संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनावर मात करण्यासाठी लोकांनी स्वत:हून स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. या मोहिमेचा हाच मुख्य उद्देश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, हाऊसिंग सोसायट्या आदी सर्वांच्या सहभागातून ही मोहीम यशस्वी करण्यात यावी. प्रत्येक इमारतीमध्ये गृहभेटींचे नियोजन करावे. दैनंदिन नियोजन करुन सर्वांनी मोहिमेवर लक्ष केंद्रीत करावे. जनजागृतीसाठी ठिकठिकाणी बॅनर्स लावणे, लोकांना माहितीपत्रकांचे वाटप करणे यावरही भर देण्यात यावा. चालू आठवड्यात मोहीम वेगात राबवून अधिकाधिक गृहभेटी पूर्ण होतील असे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
मोहिमेत हाऊसिंग सोसायट्या आणि अंगणवाड्यांचा सहभाग घेण्याबाबत यावेळी चर्चा झाली. संबंधित विभागांशी चर्चा करुन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यात येतील, असे पालकमंत्री ठाकरे यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनासाठी उपलब्ध असलेला औषधांचा साठा, ऑक्सीजनची व्यवस्था, जंबो सेंटर्स, रुग्णवाहिका, उपलब्ध खाटांची संख्या, आयसीयू खाटांची संख्या याची माहितीही पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी घेतली. जिल्ह्यात ऑक्सीजन, औषधे, रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
उपनगर जिल्ह्यातील झोन क्रमांक ३ ते ७ मधील सर्व १५ वॉर्डांचा आढावा घेण्यात आला. या मोहिमेअंतर्गत स्वयंसेवक हे त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून नागरिकांची प्राणवायू पातळी, शारीरिक तापमान, लक्षणे तपासत आहेत. नागरिकांना आरोग्य शिक्षणासह महत्त्वाचे आरोग्य संदेश देणे, कोरोनाचे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे याचाही यात समावेश आहे. मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात येत आहे. मोहीम कालावधीत साधारणपणे दोन वेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेट देणार आहेत.