Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सांगली- वारणा धरणग्रस्त आणि चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर महसूल विभाग, वन आणि पुनर्वसन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पंधरा दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे चांदोली अभयारण्यातून पुर्नवसन केलेल्या वसाहती मधील लोकांना निर्वाह भत्ता धनादेशाचे वितरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.शिंदे, चांदोली अभयारण्य विभागीय वनअधिकारी एम. महादेव मोहिते, लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता पारळे, सहायक वनसंरक्षक जी. आर. चव्हाण यांच्यासह महसूल व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चांदोली अभयारण्य क्षेत्रामधून 18 वसाहतींचे पुनर्वसन शिराळा-वाळवा व मिरज तालुक्यामध्ये करण्यात आले आहे. या पुनर्वासित लोकांना सन 1997 पासून निर्वाह भत्ता प्रलंबित होता. पालकमंत्री जयंत पाटील यांनी 18 वसाहतींमधील 537 खातेदारांकरिता 4 कोटी 19 लाख 45 हजार 772 रूपयांचा निधी मंजूर करून आणला. या निर्वाह भत्याचे वाटप पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे आज करण्यात आले.
#solapurcitynews