Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
यवतमाळ- जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यू दर कमी होत असून मागील तीन दिवसांपासून कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, हे आशादायी चित्र आहे. कोविड आजारावर नियंत्रण ठेवण्यात जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्या योगदानासमवेतच आरोग्य यंत्रणेचेही फार मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास पालकमंत्री या नात्याने प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
कोरोनाच्या सुरवातीला जिल्ह्यात सर्वत्र तातडीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. तेथे डॉक्टरांची पदे तातडीने भरण्यास प्रर्याप्त वेळ नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर आरोग्य विभाग व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत पदभरती करणे आवश्यक होते, शासनाने देखील कंत्राटी पद्धतीने सदर जागा भरण्याचे निर्देश दिले होते. मात्र ही पदे परिपूर्णपणे भरण्यात न आल्याने पालकमंत्री राठोड यांनी नाराजी व्यक्त केली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना कोविड केअर सेंटरमधून कार्यमुक्त न केल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. आरोग्य विभागाचा हा हलगर्जीपणा खपवून घेतल्या जाणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सुनावले.
आगामी दुर्गोत्सव व दसरा तसेच दिवाळी सणाचे प्रसंगी कोरोना संसर्ग वाढल्यास आरोग्य यंत्रणेने पूर्वनियोजन करून ठेवावे असे पालकमंत्री यांनी सांगितले. यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी यांनी दुर्गादेवी मंडळांनी डॉक्टरांची सेवा, सॅनिटायझर व इतर आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात यावी असे सुचविले.