fbpx
EgL6m3aU4AAjbQr भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा; माती आणि मातेला विसरू नका - मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला

नागरी सेवा परीक्षेतील गुणवंतांचा विधानभवनात गौरव

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करताना माती आणि मातेला मात्र विसरू नका, असा सल्लाही त्यांनी प्रशासकीय सेवेत रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला.

                  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 2019 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील 79 उमेदवारांचा गौरव समारंभ महाराष्ट्र विधानमंडळामार्फत विधानभवन येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी यावेळी उपस्थित होते.

1 भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा; माती आणि मातेला विसरू नका - मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला

             प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले, आता पंख फुटले आहेत, मोठी भरारी घ्यायची आहे. त्यामुळे कोणतीही जबाबदारी पार पाडताना सकारात्मक बदल घडून माझे राज्य, देश सर्वोत्तम झाले पाहिजे ही जिद्द बाळगा. शासन आणि प्रशासन ही दोन चाके असल्याने चुकीचे काम होऊ न देता चांगल्या कामावर ठाम राहून आपल्या हातून उत्तम कार्य घडो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. राज्यातील सध्याचे प्रशासकीय अधिकारी उत्तम काम करीत असून सर्वांच्या सहकार्याने शासन सकारात्मकतेने काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाईक निंबाळकर यांनी, सरकार कुणाचेही असले तरीही प्रशासकीय अधिकारी हा महत्त्वाचा घटक असल्याने कायदा योग्य रितीने वापरून सर्वसामान्यांची कामे सकारात्मकतेने करा, असे सांगितले. विधिमंडळाद्वारे प्रशासकीय सेवेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या सत्काराचा पायंडा यापुढेही कायम राहील असेही ते म्हणाले.

2 भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा; माती आणि मातेला विसरू नका - मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला

पटोले यांनी विधीमंडळामार्फत सत्काराचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याची माहिती देऊन हा सत्कार राज्याच्या वतीने असल्याने पुढील पिढीसाठीही मार्गदर्शक ठरेल, असे सांगितले. शासनाने राज्यातील प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्र सर्व विभागीय पातळीवर सुरू करून त्यांचे सशक्तीकरण करावे, अशी सूचनाही केली.

               उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या इमारतीत हा सत्कार होत असल्याने याला विशेष महत्त्व असल्याचे सांगून आपण कोणतीही जबाबदारी पार पाडताना सर्वसामान्यांना न्याय देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कराल, असा विश्वास व्यक्त केला. आपण मिळविलेले यश हे मोठे आहे. अनेक उमेदवार हे सर्वसामान्य घरातून आलेले आहेत, सर्व यशस्वी उमेदवारांचे कौतुक करून कोणताही प्रश्न टाळण्यापेक्षा संवेदनशील बनून तो सोडवण्यावर भर द्यावा. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन आपल्या हातून लोकाभिमुख काम व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

महसूलमंत्री थोरात यांनी राज्य किंवा देश पुढे नेण्यात अधिकाऱ्यांची मोठी जबाबदारी असल्याचे सांगून राज्याचा नावलौकिक वाढवा, अशा शुभेच्छा दिल्या. फडणवीस यांनी प्रशासकीय अधिकारी हा लोकाभिमुख काम करण्यासाठी आणि सरकारची प्रतिमा ठरवणारा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. आपल्या अधिकारांचा सकारात्मक उपयोग करून समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करायची आहे, हे विसरू नका. विनयशीलता बाळगून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवता आले तर ती सर्वात मोठी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समाधान मिळेल असे सांगून त्यांनी भावी अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

       यशस्वी उमेदवारांच्या वतीने नेहा भोसले आणि मंदार पत्की यांनी मनोगत व्यक्त करताना या सत्कारातून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव असून ती निश्चित पार पाडू, असा विश्वासही व्यक्त केला.

               यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नेहा भोसले, मंदार पत्की, आशुतोष कुलकर्णी, दीपक करवा, विशाल नरवाडे, राहुल लक्ष्मण चव्हाण, नेहा दिवाकर देसाई, अभयसिंह देशमुख, यशप्रताप श्रीमल, अश्विनी वाकडे, सुमित महाजन, योगेश कापसे, गौरी नितीन पुजारी, शंतनू अत्रे, अनिकेत सचान, अजहरोद्दीन काजी जहिरोद्दीन काजी, निमिश पाटील, महेश गीते, अमितकुमार महातो, प्रणोती संकपाळ, सुमित जगताप, प्रसन्ना लोध, अंकिता वाकेकर, स्वप्निल जगन्नाथ पवार, अभिषेक दुधाळ, डॉ.प्रदीप डुबल, करूण गरड, हृषीकेश देशमुख, निखिल कांबळे, संग्राम शिंदे, सत्यजित यादव, सुनील शिंदे या उपस्थित यशस्वी उमेदवारांचा गौरवचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. ध्येय निश्चित असेल तर यश निश्चित मिळते हे या यशस्वी उमेदवारांनी दाखवून दिल्याचे सांगून विधानसभा उपाध्यक्ष श्री.झिरवाळ यांनी सर्वांचे आभार मानले.

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update