fbpx
Lendi Project Meeting 750x375 1 लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

भावनात्मक नाळ जुळल्याने लेंडी प्रकल्पासाठी कटिबद्ध – पालकमंत्री अशोक चव्हाण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नांदेड- “महाराष्ट्रातल्या सिंचनाच्या दृष्टीने स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर एक दूरदृष्टी बाळगली. या दूरदृष्टीतूनच  जायकवाडीचा प्रकल्प आकारास आला. इथल्या भुमिपुत्रांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी सदैव कर्तव्य दक्षता बाळगली. त्याच दूरदृष्टीतून आपल्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूरच्या काठावर असलेल्या हजारो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने लेंडी प्रकल्पाचे त्यांनी नियोजन केले. याच्या भूमिपूजनाला त्यांच्या समवेत मीही उपस्थित होतो. यामुळे मी या प्रकल्पाकडे केवळ योजना म्हणून नाही तर त्यांनी जी बांधिलकी इथल्या शेतकऱ्यांप्रति जपली तीच बांधिलकी आणि कर्तव्य दक्षता स्वीकारुन या प्रकल्पासाठी नेहमी हळवा होतो” या शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी लेंडी प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी सर्वांच्या भावनेला साद घालत कटिबद्धता व्यक्त केली. लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी समजून घेऊन त्या शासन स्तरावर कायद्याच्या चौकटीत सोडवून त्यांना अधिकाधिक न्याय कसा देता येईल या उद्देशाने आज पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात व्यापक बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. तुषार राठोड, माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, संघर्ष समितीचे अध्यक्ष हणमंतराव खंडागळे, राजू पाटील, प्रकल्पग्रस्त गावांचे सरपंच, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, विष्णुपुरी प्रकल्पाचे उपअभियंता आर. एम. देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

                  तात्विक पातळीवर धरणांबाबत कदाचित कोणाच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. या भूमिकांच्या पलीकडे जेव्हा आपण शेतकरी म्हणून विचार करतो तेव्हा ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळाले नाही त्या शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात जर आणायचे असेल तर त्यांना सिंचनाच्या सुविधा या जिथेजिथे शक्य होतील त्या-त्या ठिकाणी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत याला आम्ही आजवर प्राधान्य दिले आहे. जायकवाडीमुळे आज जो मराठवाड्यातला बहुतांश भाग ओलिताखाली आला आहे, ज्यामुळे औरंगाबाद सारख्या महानगरासह कित्येक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे त्या प्रकल्पासाठी कधी काळी स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी लोकांचे वाट्टेल ते बोलही ऐकून घेतले. पाण्याचे महत्त्व पटल्यानंतर याच लोकांनी त्यांना उचलून घेत माळा घातल्या या शब्दात त्यांनी आठवणींना उजाळा दिला. लेंडी प्रकल्पाचे काम हे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला या प्रकल्पातून थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 15 हजार 710 हेक्टर जमीन ओलिता खाली येणार आहे. यातील 62 टक्के पाणीसाठा म्हणजेच 100.13 दशलक्ष घन मीटर पाणी हे देगलूर, मुखेड या भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. या प्रकल्पावर लिफ्ट इरिगेशन सारख्या योजना साकारल्यास हा परिघ भविष्यात आणखी विस्तारता येणार आहे. 70 टक्के काम आजच्या घडीला पूर्ण झाले असून दगडी सांडव्याचे कामही 75 टक्के पूर्ण झाले आहे. हे काम जितक्या लवकर पूर्ण होईल तितक्या लवकर अनेक दशकांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल,  त्यांच्या शेताला पाणी मिळेल. जवळपास 20 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुखेड सारख्या पाणीटंचाईच्या भागातील शेती सुजलाम सुफलाम होईल. या भागातील आर्थिक विकासाचे मार्ग यातच दडलेले असल्याने सर्वांनी मिळून हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आता एक सकारात्मक भूमिका घेऊन पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

                सन 1984-85 मध्ये या प्रकल्पाची किंमत साधारणत: 55 कोटींच्या घरात होती. ती आता विविध कारणांमुळे प्रकल्प रेंगाळल्यामुळे 2200 कोटीच्या घरात पोहोचली आहे. या प्रकल्पास जी दिरंगाई होत आहे त्याबद्दल मी दु:खी असून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची भूमिका व्यक्तिगत पातळीवर मला मान्य आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या आहेत त्या सर्व पूर्ण करण्यास प्रशासन तयार आहे. शेतकऱ्यांनी शासनाचे नियम व न्यायालयीन निवाडे लक्षात घेऊन कुठेतरी विश्वासाने प्रकल्पाला साथ दिली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मंत्रालयीन पातळीवर सोडविण्यासाठी लवकरच जलसंपदा मंत्री यांच्या समवेत बैठक घेऊ असेही त्यांनी सांगितले. हा प्रकल्प आता कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केल्याशिवाय गत्यंतर नाही. प्रकल्पग्रस्तांनीही कायद्याच्या चौकटी लक्षात घेता शासनाला पूर्ण सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सांगितले. विश्वासर्हतेच्या पातळीवर यातील अनेक मागण्या आपल्याला समजून घ्याव्या लागतील अशी भूमिका विशद करत त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांना या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी निवेदन दिले. शासन पातळीवर ज्या प्रक्रिया सुरु आहेत त्याबद्दल त्यांनी विश्वासही व्यक्त केला.

पुनर्वसनासाठी देगलूर उपजिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गटाची निर्मिती

लेंडी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी मी अधिक दक्ष आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पूनर्वसनासंदर्भातील भूमिकेशी मी पूर्णत: सहमत आहे. जी गावे पुनर्वसन केली जात आहेत त्या गावातील प्रत्येक काम हे गुणवत्तापूर्ण व्हावे व त्यात नाविन्य असावे यासाठी देगलूरच्या उपजिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक गटाची निर्मिती केली जाईल असेही त्यांनी सूचित केले. या गटातील सर्व सदस्य हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या लोकसहभागातून, त्यांना विश्वासात घेऊन विकास कामे पूर्ण करतील असेही त्यांनी स्पष्ट केले. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून रस्ते व इतर नागरी सुविधा या सर्व कामांचा अंतर्भाव झाला पाहिजे, असे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पाच्या पूर्णत्वाबाबत दरमहिन्यांला आढावा बैठक घेऊन आता हे काम रेंगाळत ठेवणे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही असा इशाराही त्यांनी दिला.

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update