मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे म्हणजेच एसआयटीकडे वर्ग करावा, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतने मानसिक दबावाखाली आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यावर सुनावणी घेण्यापूर्वी यात प्रतिवादी करण्यात आलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला या याचिकांची प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश बुधवारी देत मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकांवर उद्या, शुक्रवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केलं आहे. बॉलिवूड, राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांचे एकमेकांशी असलेल्या संबंधांचा सुशांत बळी ठरल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.