Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
भंडारा- कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण परिसरात वाढत असल्याने ग्रामीण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोकांच्या मनातील ही दहशत व भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने माणुसकी जपून जबाबदारी पूर्वक उपाययोजना करण्याची गरज आहे. कोरोना रोगाला हद्दपार करण्यासाठी शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या संकल्पनेतून प्रामाणिकरित्या प्रत्येक नागरिकाच्या चाचण्या करणे गरजेचे आहे. सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांच्या घरीच होम आयसोलेशन मध्ये उपचार व्यवस्था करण्याची जबाबदारी ही आरोग्य प्रशासनाची असून यात दुर्लक्षित धोरण अवलंबिल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
साकोली तालुक्यातील कोवीड 19 संदर्भात तहसील कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्य व केंद्र शासनाच्या सल्लागार समितीच्या सूचनेनुसार कोरोना रोगाच्या संदर्भात असलेल्या नियमांमध्ये शिथिलता करण्यात आलेली असून ग्रामपातळीवर सरपंच व पदाधिकारी तसेच कुटुंब प्रमुख यांच्या समन्वयातून सौम्य व मध्यम स्वरुपाच्या रुग्णांना घरीच उपचार व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये असलेली भीती ही कायमची दूर व्हावी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्यावी याकरिता जनजागृती करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.