सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
कोविड-19 पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्याकरिता मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय दिनांक 30 मे 2020 व दिनांक 23 जून 2020 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये, 65 वर्षावरील कोणत्याही कलाकार / क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती. तथापि, उच्च न्यायालयाने सदरील अट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने, आता ६५ वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणात सहभागी होण्याची मुभा राहील अशीही माहिती देशमुख यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, ज्येष्ठ अभिनेते आणि सिनेमा अँड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिंटाचे मानद अध्यक्ष विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते आणि सिंटाचे मानद उपाध्यक्ष मनोज जोशी, उपाध्यक्ष अभिनेते दर्शन जरिवाला, सहसचिव अभिनेते अमित बहल, अभिनेत्री राजेश्वरी सचदेव, खजिनदार अभिनेते अभय भार्गव यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले आहेत.
#solapurcitynews