निधन वार्ता

खडकी येथील अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आर्थिक मदत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नंदुरबार- धडगाव तालुक्यातील खडकी पॉइंट येथे झालेल्या वाहन अपघातात मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत करण्यात येईल आणि जखमी  व्यक्तींवर आवश्यक उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे खडकी  येथील अपघातातील जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतल्यानंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जि.प. समाज कल्याण सभापती रतन पाडवी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.के.डी.सातपुते उपस्थित होते. ॲड.पाडवी म्हणाले, झालेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. जखमींवर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मृत प्रवासी गरीब कुटुंबातील होते आणि त्यात 5 महिलांचा समावेश असल्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींना  आर्थिक सहाय्य देण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्यांनी धीर दिला. जखमी व्यक्तींच्या उपचारात कोणतीही कमतरता ठेवू नये अशा सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. महिद्रा मॅक्स वाहनातून 24 मजूर खडकी येथून गुजरातमधील रोस्का येथे जात असताना खडकी जवळील घाटात वाहकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलट दिशेने 500 मीटर खोल दरीत कोसळले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अधिकाऱ्यांना मदतीचे  निर्देश दिले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्वत: घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्याची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे  हेदेखील यंत्रणेसह घटनास्थळी पोहोचले. अपघातात 6 व्यक्तींचा मृत्यू झाला. 7 गंभीर प्रवाशांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित 11 प्रवाशांना किरकोळ दुखापत असल्याने त्यांना तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दुपारी त्यातील 8 व्यक्तींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143