fbpx
Solapur City News 21

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली-  संत, छत्रपती शिवराय, समाजसुधारक, शाहीर यांनी शिकवलेल्या मराठी बाण्याचा अंगीकार करून देशात महाराष्ट्राचे वैभव वाढविण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार, लेखक तथा वक्ते ज्ञानेश महाराव यांनी आज व्यक्त केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे १७ वे पुष्प गुंफताना “उठावा महाराष्ट्र देश” या विषयावर  महाराव बोलत होते. महाराष्ट्रातील संतांनी येथील जनतेला समतेचा व वैज्ञानिक दृष्टीकोण दिला. छत्रपती शिवरायांनी अस्मितेसाठी लढून स्वराज्य स्थापनेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा वस्तूपाठ दिला. शाहिरांनी लढायला शिकवले तर समाजसुधारकांनी प्रबोधनाची मोठी परंपराच या प्रदेशाला दिली आहे. राज्यस्थापनेच्या 60 वर्षांनंतरची स्थिती पाहता आम्हाला पुन्हा या थोरांनी दिलेला मराठीचा बाणा अंगीकारून राज्याचे वैभव वर्धेष्णु करावे लागेल, असे विचार महाराव यांनी यावेळी मांडले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहिरांचे मोलाचे योगदान राहिले आहे, यातील अग्रणी शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईसह मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामिल व्हावा या आशयाने लिहीलेल्या माझी मैना गावाकडे राहिली..’ या प्रसिध्द छक्कडमध्ये उठला महाराष्ट्र देश असा उल्लेख केला व त्यातून येथील त्रासदायक स्थिती व अन्याया विरोधात उभे राहण्याचा संदेश त्यांनी दिला होताआजही आम्हाला याच भावनेतून मराठीबाणा जपावा लागेल असे महाराव म्हणाले. राजा बडे यांनी लिहिलेल्या दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा..’ आणि सेनापती बापट यांनी ‘महाराष्ट्रा विना राष्ट्र गाडा न चाले..’ या शब्दात केलेला महाराष्ट्राचा गौरव पाहता महाराष्ट्राची ही गौरवशाली परंपरा पुढे घेवून जाण्याची जबाबदारीही आपल्या राज्यातील जनतेवर असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

           संत ज्ञानेश्वर, चक्रधरस्वामींपासूनची महाराष्ट्रातील संतांची परंपरा विविध समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या संतांनी प्रगल्भ केली संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाची पताका देशभर नेली. संत नामदेव महाराज रचित ‘परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी …’ हा  ८०० वर्षांपूर्वी  लिहिलेला अभंग आजही लोकांच्या ओठावर आहे. संत तुकडोजी महाराज व गाडगेमहाराजानंतर ही परंपरा खंडीत झाली. या संतांनी दिलेला भक्कम वैचारिक वारसा महाराष्ट्राला आहे. संतांनी देवधर्मापलीकडे जावून अंधश्रध्देमध्ये अडकू नका, जातीयता पाळू नका, जनतेची फसवणूक करू नका व स्वत:ही फसू नका असा संदेश दिला. संतानी आपल्याला विज्ञानाकडे नेले पर्यावरणाकडे नेले. पण, आपण त्याकडे किती लक्ष दिले या प्रश्नाचे उत्तर फार समाधानकारक मिळणार नाही. येथील जनतेने संतांच्या विचारातील सोयीचा भाग तेवढा घेतला व प्रगतीशिल विचार टाळले हेही चित्र आपल्याला दिसून येते. संतांनी दिलेला वैज्ञानिकदृष्टीकोण बहुतेक ठिकाणी पाळला जात नाही व त्याचा दैनंदिन जीवनात अवलंब होत नसल्याचे निरीक्षण  महाराव यांनी मांडले. संतांनी अभंग लिहीले तसे महात्मा फुले यांनी ‘अखंड’ लिहीले त्यात त्यांनी दगडाला देव मानन्यापेक्षा कर्तृत्वाने माणूस देव होवू शकतो, माणसाने माणसासारखे वागावे हा संदेश दिला. ‘अखंड’ मध्ये त्यांनी निर्मिकाची कल्पना मांडतांना निर्मिक म्हणजे निसर्ग निर्माण करणारा असे विज्ञान मांडले.

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, त्याला स्मरा मनी दिनरात्र।

सर्वांसाठी  एक पृथ्वी आहे केली भार वाही भली सर्वत्रांचा’असे थोर विचार त्यांनी मांडले आहेत. परंतु, हे विचार आज समाजात अंगिकारलेले दिसत नाहीत, असे त्यांनी सांगितले. राज्यातील शाहिरांनी स्वातंत्र्याचा, समतेचा, कामगारांचा, शेतकऱ्यांचा लढा लढवला. आज ही शाहिरी पंरपरा राहिली का? याचे आत्मचिंतन करावे लागेल, असे ते म्हणाले. शाहिरांनी आम्हाला लढायला शिकवले पण, आपण आपल्या आजुबाजुचे लढे शब्दबध्द करून लोकांना सांगत नाही हे आताचे चित्र असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला लोकहितवादी, आगरकर, टिळक, सावरकर आदी समाजसुधारकांनी केलेल्या प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. प्रबोधनकर ठाकरे यांनी महात्मा फुले यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आणले. त्यांनी  ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या आपल्या पुस्तकात म्हटले आहे, ‘या देशातला तरूण जेव्हा स्वयं प्रज्ञेने विचारांचा हातोडा उचलेल तेव्हा त्याच्या विचारांचा हातोडा देव व देवळांवर पडेल’ त्यांनी १९२६ मध्ये हे धाडसी विचार  मांडले होते. राज्याला असलेली प्रबोधनाची ही श्रेष्ठ पंरपरा आपण अंगीकारली आहे का? याचाही विचार व्हायला हवा, असे  महाराव म्हणाले. अखंड भारत परकियांनी पादाक्रांत केला होता व भारतीय राजे मांडलीक झाले असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने स्वराज्य निर्माण केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनीही राज्यघटनेत छत्रपती शिवरायांचे स्वराज्य, महात्मा फुलेंचा  समतेचा लढा, राजर्षि शाहुंचा सामाजिक न्यायाचा संदेश मांडल्याचे दिसून येते. त्याच राज्यघटनेवर आज भारत देश मार्गक्रमण करत आहे. आपण या महामानवांच्या परंपरेचे लाभार्थी आहोत पण, आपण त्यांच्याकडून घेतलेले विचार आपल्या व्यवहारातून, वर्तनातून समाजाला परत करत नसल्याचेही चित्र आहे असे त्यांनी सांगितले. कृतीशील विचारांचे पीक महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. हा ‘मराठी बाणा’ आपण जपला पाहिजे  त्यातून स्वत:ला प्रेरणा मिळेल आपण काय इतिहास घडविला व वर्तमानात आपण काय इतिहास घडवायचा आहे हे कळेल.

इतिहास घडविला इथे मंत्र स्वातंत्र दिला भारती !

याच यशाचा मंत्र शिकविते माझी मराठी माती !!

अभिमान डिवचन्या याल, हा बदलावया भुगोल !

हा शिवबाचा लाल शत्रुचा होईन कर्दनकाळ !!

गर्जेल पुन्हा धावेल होऊनी सेना !

देश रक्षणा अर्पिण प्राणा हाच मराठी बाणा !!

असा मराठी बाणा देशाला दाखविण्याची गरज आहे तरच आपण महाराष्ट्राचे वैभव वाढवू शकु असा विश्वास महाराव यांनी यावेळी व्यक्त केला.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update