Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
शिर्डी- देशात कोरोनाच्या दूसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण बाधित होत असून, या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोपरगांव येथे केले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, देशामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असून, पहिल्या आणि आताच्या लाटेतील रुग्णांच्या संख्येत मोठी तफावत आहे. कोरोना हे मानवजातीवर आलेले संकट असून तो रोखण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून करावे. केंद्र शासनाने रेमडेसिविर औषध निर्यात करण्यास बंदी घातली असल्याने या औषधाचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल चोवीस तासात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मंत्रीमहोदयांनी यावेळी दिले. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडण्याचे आणि कोरोनाची साखळी तोडण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल प्राप्त येईपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सांगितले. आमदार आशुतोष काळे यांनी कोविड रुग्णांसाठी ॲम्बुलन्स तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. कोविड रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचा नाशिक जिल्ह्यातून पुरवठा करावा, कोविड केअर सेंटरला ऑक्सिजनची जोडणी तातडीने करण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा नागरिकांनी स्वयंशिस्तीने अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच कोविडबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आल्याचे आणि चाचणी अहवालाचा कालावधी कमी केल्याचे सांगितले. उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.