Economy

जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार

अमरावती-  तिवसा पंचायत समितीची सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी येथून व्हावी. जिल्ह्यात इतर ठिकाणी सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामेही गतीने पूर्ण होतील. जनसामान्यांच्या प्रगतीतूनच विकासाची नवी शिखरे गाठणे शक्य होत असते. हे लक्षात घेऊन प्रशासनाने काम करावे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे केले. तिवसा पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण व नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जि.प. अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, माजी आमदार वीरेंद्र जगताप, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, उपसभापती शरद वानखडे, पूजा आमले, शंकर गावंडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, गटविकास अधिकारी चेतन जाधव आदी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री यांनी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण केले, तसेच हुतात्मा दिनानिमित्त हुतात्मा स्तंभाला अभिवादन आणि पुष्पांजली वाहिली. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, उदघाटनाचा हा क्षण संस्मरणीय आहे.अद्ययावत आणि सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. प्रशासनाकडून जनसामान्यांची कामे आता गतीने पूर्ण व्हावीत.  विकासात कधीही राजकारण अडसर बनू नये याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. सामान्यांच्या  प्रगतीतूनच विकासाची नवी शिखरे गाठणे शक्य होत असते. याची जाणीव प्रशासनाने ठेवावी. लोकप्रतिनिधी आणि  प्रशासन यांनी एकमेकांशी  ताळमेळ  ठेवत काम केले तर निश्चितच गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व गतीने काम होते. गुरुकुंज मोझरी विकास आराखडा , संत गाडगेबाबा निर्वाणभूमी विकास आराखडा अशी अनेक कामे आपण पाठपुराव्याने केली. महिला भगिनींच्या हाताला बळ देणारी योजना लवकरच हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वानखेडे म्हणाले,  पंचायत समिती स्तरावरून बचतगटाची चळवळ गतिमान व्हावी. महिलांचे सक्षमीकरण करणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणाऱ्या योजनांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. जि. प. अध्यक्ष  देशमुख म्हणाले, यापूर्वी अनेक विकासकामे निधीअभावी थांबली होती. मात्र पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अथक प्रयत्नामुळे जिल्ह्यात विकासकामांसाठी मोठा निधी प्राप्त होत आहे. अनेक कामे पूर्णत्वास जात असल्याने विकासाचा प्रवाह गतिमान झाला आहे.  जगताप म्हणाले, इमारत तयार होणे ही मूलभूत सुविधा आहे ,पण सामान्यांच्या समस्या सोडविणे ही विकासाची गरज आहे. घरकुलची समस्या प्राधान्याने सोडविण्यात याव्या, असे त्यांनी सांगितले. येडगे म्हणाले, गावावरून राष्ट्र ओळखावे. गावाच्या  विकासावरून  राष्ट्राचे भविष्य ओळखता येते,असे  राष्ट्रसंत म्हणतात.  ही सुसज्ज इमारत म्हणजे  विकासाच्या दिशेने चालणारे पाऊल आहे.   प्रशासकीय कामे  सुलभतेने करता यावी यासाठी पंचायत समितीची  सुसज्ज इमारत असणे आवश्यक होते. विकास  योजना आता अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल. नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते यावेळी झाला. ग्रामपंचायत  नवनिर्वाचित सदस्यांना  झाडाचे  रोपटे देऊन त्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते  करणार आला. आपल्या परिश्रमातून या रोपट्याला विकासाची फळे येऊ द्या, सर्वसामान्यांच्या विकासाला गती द्या  अश्या शुभेच्छा  नवनिर्वाचित सदस्यांना देण्यात आल्या. यावेळी पालकमंत्री यांनी महिला बचत गटाच्या स्टॉलला भेट देऊन गट सदस्यांशी संवाद साधला. सभापती शिल्पा हांडे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन अजय अडिकणे आणि कलावंत दीपाली बाभुळकर यांनी केले 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143