Economy

न्यायालयाची नवीन इमारत संगमनेरच्या वैभवात भर टाकणारी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

शिर्डी- न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीने जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर न्यायाधीश अशा विविध सोळा न्यायालयांच्या कामकाजासाठी  दिमाखदार, वैभवशाली व अद्ययावत बांधलेल्या घुलेवाडी फाटा, संगमनेर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.  या इमारतीमुळे शहराच्या वैभवात भर पडेल असे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी काढले. घुलेवाडी फाटा येथे नव्याने उभारलेल्या  इमारतीचा लोकार्पण सोहळा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि अहमदनगरचे पालक न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  श्रीकांत आणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संपन्न झाला. यावेळी संगमनेरचे जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.एस.घुमरे, संगमनेर न्यायालय येथील न्यायिक अधिकारी, संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास आहेर, उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  एस. व्ही. गंगापूरवाला म्हणाले, न्याय व्यवस्था ही लोकशाहीतील  महत्त्वाची व्यवस्था आहे. न्यायदानाच्या प्रक्रियेत न्यायालयीन अधिकारी यांच्याबरोबरच वकिलांचा बरोबरीने सहभाग असतो. त्यामुळे पक्षकारांना सौहार्दपूर्ण न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची सूचना न्यायमूर्तीनी  केली. नव्याने उभी राहिलेली इमारत ही न्यायालयीन कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे. सर्व न्यायालयीन कर्मचारी व अधिकारी यांनी अधिक प्रभावीपणे काम करुन जनतेला न्याय मिळावा यासाठी प्राधान्य द्यावे. तालुकास्तरावर उभी राहिलेली ही अद्ययावत इमारत नक्कीच तालुक्याच्या व जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारी आहे असेही ते म्हणाले.

                    महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, भव्य आणि वैभवशाली अशी ही इमारत संगमनेर शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आहे. प्रशस्त आणि भरपूर जागा यामुळे न्यायाधीश, अधिकारी, बार असोसिएशन सदस्य, पक्षकार यांचीसुद्धा मोठी सोय होणार असून न्यायालयीन कामकाजाला त्यामुळे वेग येणार आहे. या न्यायालयाच्या इमारतीकरिता वकील संघाने सातत्याने मागणी करुन पाठपुरावा केला होता. शासनाकडून सातत्याने निधी मिळाल्याने ही वैभवशाली इमारत उभी राहिली आहे. वकिली कामकाज करत असतानाच आपल्या सामाजिक जीवनाचा पाया घातला असून न्यायालयात पक्षकारांची  बाजू मांडत असताना मोठ्या प्रमाणात लोकसंपर्क झाला आहे. संगमनेर येथे उभारण्यात आलेल्या इमारतीएवढी राज्यात व जिल्हास्तरावर  एवढी भव्यदिव्य इमारत असण्याची शक्यता कमी आहे असे ते म्हणाले. या इमारतीतमधे स्वच्छता व चांगल्या कामामुळे जिल्ह्यासह राज्यात लौकिक निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संगमनेर येथे मोठ्या प्रमाणात न्यायालये असून तीन जिल्हा न्यायाधीश, एक दिवाणी न्यायाधीश, पाच वरिष्ठ स्तर न्यायाधीश, पाच दिवाणी व प्रथम दंडाधिकारी न्यायाधीश अशी  न्यायालये कार्यरत आहेत. सध्याच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असून ती दिवसेंदिवस वाढत आहेत. भविष्यात संगमनेर व अकोले तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्यामुळे भविष्यात येथे औद्योगिक न्यायालय व कामगार न्यायालय होण्याची शक्यता असल्याने ही सर्व न्यायालय एकाच ठिकाणी होण्यासाठी आपल्या महसूलमंत्री पदाच्या काळात राज्य  शासनाकडून सातत्याने निधी मिळविल्याची माहिती दिली. तसेच शासनाकडून अतिरिक्त निधी मिळवून  इमारतीत अंतर्गत जोड रस्ते, डांबरीकरण व मजबुतीकरण, संरक्षक लोखंडी गेट, जमीन सपाटीकरण, दोन चाकी वाहन पार्किंग, न्यायाधीशांसाठी स्वतंत्र वाहनतळ, इमारत व परिसरात विद्युत जनरेटर उभारणी करणे, परिसराचे सुशोभीकरण, वकील कक्षातील अंतर्गत फर्निचर या बाबींसाठी निधी मंजूर करून घेतला होता असे ते म्हणाले. या इमारतीच्या लोकापर्णामुळे बार असोशिएशन, न्यायिक अधिकारी, घुलेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास आहेर यांनी केले. यावेळी वकील संघाचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143