maratha arakshan
Maharashtra

मराठा आरक्षणासंदर्भातील सद्यस्थितीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे विधानपरिषदेत निवेदन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष  अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत निवेदन केले. त्यांनी या निवेदनात म्हटले की, 8 मार्चपासून मराठा आरक्षणाबाबत नियमितपणे सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविले होते. त्याप्रमाणे खुलासेवार सुनावणीचा कार्यक्रम नेमून दिलेला होता. युक्तिवादाकरिता ठराविक दिवस सर्व संबंधित पक्षकारांकरिता नेमून दिलेले होते. ही सुनावणी सलगरित्या माननीय पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे होणार होती. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे तीन अंतरिम अर्ज दाखल करण्यात आले होते. आरक्षणासंबंधी असलेली निरनिराळी प्रकरणे एकत्रित करुन त्यांची चौकशी एकत्रित व्हावी. विषय घटनेशी संबंधित असल्यामुळे देशातील सर्व राज्यांना याप्रकरणी सामील करून घेण्यात यावे व त्यांचीही बाजू ऐकून घेण्यात यावी. इंद्रा साहनी प्रकरणी नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयांचा फेरविचार व्हावा व त्याकरिता हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावे, असे तीन अंतरिम अर्ज महाराष्ट्र सरकारतर्फे दाखल करण्यात आले होते. 8 मार्च 2021 रोजी प्रत्यक्षात सुनावणी सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्र सरकारतर्फे तीन अर्जाचा प्राधान्याने विचार व्हावा म्हणून आग्रही भूमिका सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी घेण्यात आली. त्याला सर्व अपिल करणाऱ्यांनी कडाडून विरोध केला व त्या प्रकरणाची सुनावणी पूर्वीच्या हुकुमाप्रमाणेच व्हावी, असा आग्रह धरला.

                   केंद्र सरकारतर्फे ॲटर्नी जनरल यांनी (अ) सर्व राज्यांना स्वतंत्र नोटीस बजावून त्यांचे म्हणणे याकामी विचारात घेणे आवश्यक आहे. (ब) १०२ व्या घटना दुरुस्तीनंतर घटनेच्या कलम ३४२-अ अन्वये कोणत्याही राज्य सरकारला अशा प्रकारे आरक्षण देता येणार नाही व असे आरक्षण घटनादुरुस्तीनंतर म्हणजे दि. १५/०८/२०१८ नंतर केवळ राष्ट्रपतींनाच (म्हणजेच केंद्र सरकारलाच) देता येते. सर्व संबंधितांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या तीनपैकी दोन अर्जातील भूमिका स्वीकारलेली आहे. दोन गोष्टी मान्य करणारे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. (अ) देशातील सर्व राज्यांना या प्रकरणी म्हणणे मांडण्याकरिता संधी दिलेली आहे. त्याकरिता राज्य सरकारच्या अंतरिम अर्ज क्रमांक ५५१२/२०२१ नुसार देशातील सर्व राज्यांना नोटीस देण्यात आली आहे. इंद्रा साहनी प्रकरणी दिलेल्या निकालाचा फेरविचार होणे किंवा त्यातील विषय मोठ्या खंडपीठाकडे चौकशीकरिता वर्ग करणे आवश्यक आहे किंवा कसे याबाबत या प्रकरणी विचार करण्यात येईल. वरील दोन मुद्दयांव्यतिरिक्त इतर मुद्दे, एकूण सहा मुद्दे याकामी विचारात घेण्यात येतील असे म्हणून अशा सहा मुद्यांची प्रश्नावली सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या दि. ०८ मार्च २०२१ रोजीच्या हुकुमामध्ये स्पष्टपणे नमूद केली आहे.

या प्रकरणाच्या पुढील चौकशीकरिता नव्याने वेळापत्रक खुलासेवार जाहीर केले आहे. ज्यानुसार या प्रकरणाची सलग चौकशी दि. १५/०३/२०२१ पासून दि. २५/०३/२०२१ पर्यंत घेण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये खाजगी पक्षकारांनादेखील दि. २४/०३/२०२१ रोजी त्यांचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आलेली आहे. वरील सर्व परिस्थितीवरुन असे दिसून येईल की, मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित करण्यात आलेले निरनिराळे घटनात्मक विषय केवळ महाराष्ट्र राज्यापुरते आता मर्यादित राहिलेले नसून त्यांचा विचार देशपातळीवर होणार आहे. या प्रकरणी उद्भवलेल्या सर्व प्रश्नांचा विचार करीत असताना सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्व राज्यांचे म्हणणे विचारात घेणार आहे. एवढेच नव्हे तर खाजगी पक्षकारांचे म्हणणे देखील विचारात घेणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाशी संबंधित असलेल्या सर्व संघटनांना त्यांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे मांडण्याची सुवर्णसंधी प्राप्त झालेली आहे. या संधीचा सर्वांनी फायदा करुन घेणे आवश्यक आहे, म्हणजे महाराष्ट्र सरकारतर्फे काही मुद्दे नीट मांडले गेले नाहीत, अशी खंत व  त्यातून उद्भवणाऱ्या तक्रारी होणार नाहीत. याकामी राज्य सरकार आपल्या परीने सर्व शक्तिनिशी  मराठा आरक्षणाचे पृष्ट्यर्थ बाजू न्यायालयात मांडणारच आहे. तथापि,मागील वेळेस वकिलांविरुद्ध करण्यात आलेले आरोप आता शिल्लक  राहिलेले नाही. इंद्रा साहनी प्रकरणी दिलेल्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचा फेरविचार होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे 50 टक्क्यांच्यावर आरक्षण देता येते किंवा नाही हा मुद्दा देखील आता चर्चेस आहे. सध्या सुमारे 21 राज्यांमध्ये आपल्या देशात, 50 टक्क्याहून अधिक आरक्षण असल्यामुळे व 10 टक्के आर्थिक दुर्बल घटक हे केंद्र सरकारने दिलेले आरक्षण विचारात घेता आपल्या देशात सुमारे 28 राज्यामध्ये 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देण्यात येत असल्यामुळे अशी सर्व राज्ये महाराष्ट्र राज्याच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन देतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातर्फे या प्रकरणी मांडण्यात येणाऱ्या बाजूला अधिक बळकटी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या वतीने याकामी बाजू मांडणाऱ्या सर्व वकील वर्गांनी अतिशय कष्ट केले आहेत व श्रम घेतले आहेत याची आपल्या सर्वांना जाणीव आहे. याकामी महाराष्ट्र सरकारतर्फे बाजू मांडलेल्या व मांडणाऱ्या सर्व विधिज्ञांचे  विशेष आभार मानू इच्छितो, असे चव्हाण यांनी विधानरिषदेत निवेदनाद्वारे सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143