Economy

बांधकामाधीन सिंचन प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

वाशिम- जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजना व अनुशेष अंतर्गत बांधकामाधीन असलेले १६ लघु पाटबंधारे प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढीसाठी शासन प्रयत्नशील राहील, असे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात आज झालेल्या वाशिम जिल्हा जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार अॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता एम. के. तायडे, कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे, चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, अडाण नदीवर घोटाशिवणी, सत्तरसावंगा व बोरव्हा येथे बॅरेज निर्मितीचा प्रस्ताव आहे. या बॅरेजला सुधारित प्रशासकीय मान्यता आवश्यक असल्याने हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणार आहे. पैनगंगा नदीवर ६ बॅरेज उभारणीची मागणी आहे. या नदीवरील कळमगव्हाण प्रकल्प रद्द झाला आहे. कळमगव्हाण  प्रकल्पासाठी मंजूर असलेले पाणी मसलापेन येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन बॅरेजसाठी वापरण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. त्यामुळे पैनगंगा नदीवरील एका बॅरेजचा प्रश्न मार्गी लागेल, उर्वरित ५ बॅरेजच्या अनुषंगाने तांत्रिकदृष्ट्या चाचपणी करावी.

                       सोनल मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचे वितरण योग्य रीतीने होवून त्या पाण्याचा सिंचनासाठी वापर होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत शासनाला सादर करावा. तसेच पळसखेड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील काही झाडे, विहिरी व घरांचा मोबदला देण्याची कार्यवाही प्रलंबित आहे. याबाबतचा प्रस्तावही तातडीने नियामक मंडळापुढे सादर करावा. मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी प्रकल्पाचे साडेपाच किलोमीटरचे कालवे रद्द करून उपसा सिंचन वाढविण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. सदर प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना श्री.पाटील यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे म्हणाले, तांत्रिक कारणामुळे मंगळसा प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्याऐवजी या प्रकल्पाची व्याप्ती कमी करून हा प्रकल्प करण्यात यावा. तसेच अडाण नदीवरील तीन बॅरेजच्या निर्मितीसाठी लवकरात लवकर मंजुरी मिळावी. खासदार भावना गवळी ह्या भ्रमणध्वनीद्वारे बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी पैनगंगा नदीवर नवीन ६ बॅरेजच्या उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास सिंचन क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल, असे सांगितले. आमदार अॅड. सरनाईक म्हणाले, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास शहराचा पाण्याचा प्रश्न सुटेल तसेच आजूबाजूच्या शेतीच्या सिंचनासाठी सुद्धा पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. आमदार झनक म्हणाले, पळसखेड प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील मोबदले लवकरात लवकर अदा करावेत. तसेच पैनगंगा नदीवर बॅरेजच्या उभारणीला मंजुरी द्यावी. पांगराबंदी प्रकल्पाच्या कालव्यांची लांबी कमी करून वाढीव उपसा सिंचनाला मंजुरी देण्याची विनंती केली. अधीक्षक अभियंता  तायडे यांनी जिल्ह्यातील मध्यम व लघुपाटबंधारे प्रकल्पाची सद्यस्थिती, बांधकामाधीन प्रकल्प आदीविषयी माहिती दिली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143