School & Collage

ग्रंथालयांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  मराठी भाषा जतन करण्यासाठी ग्रंथालयांची महत्त्वाची भूमिका आहे. ग्रंथालयांसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, टाऊन हॉल येथे पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी गुप्ता, मराठी भाषा सचिव श्रीमती प्राजक्ता लवंगारे, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ग्रंथालय संचालक श्रीमती शालिनी इंगोले, एशियाटिक सोसायटी, मुंबईच्या अध्यक्षा श्रीमती विस्पी बालापोरिया उपस्थित होत्या. देसाई म्हणाले, मराठी पुस्तक हक्काने मिळण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यातील ग्रंथालयांसाठी चांगले कार्य होत आहे. पैठण येथे संतपीठ स्थापन करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. शैक्षणिक उपक्रमांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढविण्याची आवश्यकता असल्याचे देसाई यांनी सांगितले.

अधिक ग्रंथालये उभारण्याची आवश्यकता -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

ग्रंथालयासंदर्भात सविस्तर धोरण आखण्याची गरज असून अधिक ग्रंथालय उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे. सामंत म्हणाले, वाचनसंस्कृती वाढावी आणि भाषेचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी राज्यातील सीमाभागासह इतर भागातही ग्रंथालये उभारणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांपासुन ग्रंथालय निर्मितीचे काम बंद असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा संवर्धनाचा हा सोहळा केवळ काही दिवसांपुरता सिमित न राहता तो पूर्ण वर्षभर चालावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ग्रंथालयांना अर्थसहाय्य

 महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील ग्रंथालयांना राज्य शासनाच्यावतीने अर्थसहाय्य देण्यात आले होते. यावर्षी या भागातील 82 ग्रंथालयांना प्रत्येकी 2 बुक केस आणि मराठी भाषेतील दर्जेदार ग्रंथांच्या स्वरुपातील सहाय्य देण्यात येणार असल्याची माहिती ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले यांनी प्रास्ताविकात सांगितले. हा कार्यक्रम https://www.youtube.com/DOLMaharashtra या लिंकवरुन प्रसारित करण्यात आला.  या कार्यक्रमात कोकण भवन येथील मुंबई विभागाच्या सहायक आयुक्त (विकास शाखा) श्रीमती मनिषा देवगुणे यांच्या ‘शब्दात गुंतले मी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  त्याचबरोबर मराठी भाषेतील पीडीएफ व डिजीटाईज स्वरुपातील ग्रंथ संचालनालयाच्या संकेतस्थळावर वाचता यावे यासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143