Economy

गरीब, गरजू व वंचितांच्या हितासाठी विकासप्रक्रिया गतिमान करण्याचा निर्धार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

अमरावती- संविधान हा लोकशाहीचा आत्मा आहे. धर्मनिरपेक्षता व संविधानाने दिलेल्या विविध मूल्यांच्या संरक्षणासाठी एकजुटीचे आवाहन करत, राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधव, महिला, वंचित, गरीब व गरजूंच्या हितासाठी विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याचा निर्धार आज व्यक्त केला. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ व्या वर्धापनदिनोत्सवात जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन झाले. त्यानंतर त्यांनी गत वर्षातील घटना, विकास प्रक्रियेचा आढावा घेत जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित केले. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, पोलीस महानिरीक्षक संजयकुमार मीना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारीने वर्षभरात उद्भवलेल्या अडचणी, त्यावर मात करण्यासाठी झालेले प्रयत्न व शेतकरी, महिला, गरीब, गरजू, वंचितांसाठी शासनाने घेतलेले निर्णय, अंमलबजावणी यांचा आढावा घेत पालकमंत्र्यांनी आपल्या चिंतनशील भाषणातून भारतीय संविधान व लोकशाही मूल्यांच्या जपणुकीसाठी एकजुटीचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, गेल्या वर्षभराचा कालखंड खूप काही शिकवणारा होता. अनेक अडचणी उभ्या राहिल्या. अनेक बाबी नव्याने उभाराव्या लागल्या. आता लस उपलब्ध झाल्यामुळे ही लढाई निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. या काळात अत्यंत कमी वेळेत जिल्हा कोविड रुग्णालय, तालुका कोविड रूग्णालय व हेल्थ सेंटर, तसेच विद्यापीठ व पीडीएमसी येथे लॅब उभी राहिली. अमरावती हे मध्यभारतातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा असणारे महत्त्वाचे केंद्र होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही लवकरच आकारास येणार आहे.गेल्या वर्षी याच दिवशी शिवभोजन योजनेचा शुभारंभ झाला व कोरोना साथीच्या काळात ही योजना गरीब व गरजू जनतेसाठी अधिक उपयुक्त ठरली. साथ लक्षात घेऊन त्याचे दरही पाच रूपयांपर्यंत कमी करण्यात आले. हजारो गरजूंनी त्याचा लाभ घेतला. कोरोनाच्या संकटाशी लढत असताना या काळात विकासाचे चक्र थांबू दिले नाही. उद्योगवाढीसाठीही प्रयत्न झाले. त्यानुसार ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’अंतर्गत अमरावतीत दोन नवे उद्योग उभारले जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

                      पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बांधवांसाठी शेतीकेंद्रित विकासावर महाविकास आघाडी शासनाने भर दिला आहे. त्यासाठी सर्वप्रथम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाऊल उचलले. गेल्या १० वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी झाली. शेतकरी ते थेट ग्राहक योजना, जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव, कृषी संजीवन सप्ताह असे नवनवे उपक्रम राबविले गेले. ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेतून शेतकरी गटांच्या माध्यमातून जिल्ह्यात २४४ विक्री केंद्रे सुरू करण्यात आली. शेतकरी बांधवांना बांधावर खतपुरवठा करण्यात आला. पावसाने नुकसानीच्या अनुषंगाने ३ लाख ६७ हजार ९१६ शेतकऱ्यांना सुमारे ३३७ कोटी रुपये मदतीचे वाटप होत आहे. ‘पोकरा’ अंतर्गत सहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे १२ कोटी रूपये अनुदान देण्यात आले. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातही पाचशेहून अधिक अर्ज प्राप्त असून, अधिकाधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येईल. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत ६ हजारहून अधिक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचाचा लाभ मिळाला. अमरावती व चांदूर बाजार तालुक्यात बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्रांसाठी १ कोटी २० लाखांचे अर्थसाह्य देण्यात आले.  कोविड काळात अंगणवाड्या बंद ठेवाव्या लागल्यामुळे बालकांना घरपोच आहार पुरवठा करण्यात आला. राज्यात पोषण आहार लाभार्थ्यांची संख्या ७५ लाखांवर नेण्यात आली आहे, असेही त्या म्हणाल्या. ‘मनरेगा’तून रोजगारनिर्मितीत महाराष्ट्रात अमरावती जिल्हा सुरुवातीपासून आघाडीवर होता व आजही आहे. रोजगारनिर्मिती एवढेच उद्दिष्ट न ठेवता ग्रामसमृद्धीकडे पाऊल टाकत आहोत. अंगणवाडी, शाळा, पाणलोट क्षेत्रे आदींच्या विकासासाठी ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात त्याचा पथदर्शी प्रकल्प सुरु आहे. त्यासाठी ‘मनरेगा’चे उद्दिष्ट २१८ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. यंदा त्यासाठी ४ हजार ३९३ कोटी ३३ लाख रुपये निधीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून २० कोटी ४१ लक्ष मनुष्यदिन एवढी रोजगारनिर्मिती होईल. या मोहिमेत नागरिकांनी कृतीशील सहभागाचे आवाहन त्यांनी केले.

कृषीपंपधारकांसाठी हितकारी धोरण

कृषी ग्राहकांना वीज जोडणी, थकित बिलात आकर्षक सवलत, पायाभूत सुविधा, सेवेत सुधारणा यासाठी नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण लागू झाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाल्या की, कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत देण्यात येणार असून पहिल्या वर्षी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यास वीज बिल कोरे करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यात १ लाख ३८ हजार २२४ कृषीपंप ग्राहक व १ हजार ३१० कोटी थकबाकी आहे. त्यात सुधारित थकबाकीची रक्कम ८०० कोटी ८० लाख आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कृषीपंप ग्राहकांना मिळणारी एकूण सूट ४०० कोटी ४० लाख रू. एवढी असेल. त्यातही ग्रामपंचायतींनी वीज बिलाची वसुली केल्यास पंधराव्या वित्त आयोगाइतका निधी गावातील विकासकामांसाठी मिळणार आहे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून एकत्रित वसूल झालेल्या वीज बिलाच्या ३३ टक्के रक्कम ग्राहकांच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने वीज बिलवसुली केल्यास प्रतिपावती पाच रूपये मोबदला, त्याशिवाय, चालू बिलाच्या २० टक्के व थकबाकीच्या ३० टक्के मोबदला मिळणार आहे. ग्रामीण क्षेत्राला ऊर्जा देणारे हे धोरण आहे, असे त्यांनी सांगितले. कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ‘सुदृढ मेळघाट अभियान’ चिखलदरा व धारणी तालुक्यातील ३२४ गावांमध्ये राबविण्यात आले. सुमारे ३४ हजार ६४ बालकांची तपासणी करून आवश्यक तिथे बालउपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्रात उपचार करण्यात आले. जिल्ह्यातील दीड लाखांहून अधिक बालके व सुमारे ३४ हजार माता यांना नियमित घरपोच आहार पुरविण्यात आला. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण केंद्रातून ‘नीट’ परीक्षेत यंदा तब्बल तेरा विद्यार्थी उत्तीर्ण होऊन राज्यात ठिकठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात आधारभूत खरेदी योजनेत मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे मेळघाटातील गरीब मका, ज्वारी उत्पादक शेतकरी बांधवांना न्याय मिळाला आहे मेळघाटातील पर्यटनाला चालना देण्यासह जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर, गुरुकुंज मोझरी, ऋणमोचन, शेंडगाव, नागरवाडी, आमला, रिद्धपूर आदी तीर्थस्थळांचाही विकास करण्यात येत आहे.

पुरस्कार वितरण

गडचिरोली जिल्ह्यात अपर पोलीस अधिक्षकपदी कार्यरत असताना दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधिक्षक डॉ. हरी बालाजी यांना पोलीस शौर्य पदक मिळाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.राजापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष ठाकरे, सहा. पो. उपनिरीक्षक अशोक मांगलेकर व पुरुषोत्तम बारड यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. बसला आग लागून घडलेल्या दुर्घटनेत ५७ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दल तिवसा पोलीस ठाण्याचे शिपाई नीलेश खंडारे यांनाही यावेळी गौरविण्यात आले. शहिद जवान मुन्ना शेलुकर यांच्या वीरपत्नी पूजा मुन्ना शेलुकर यांचा यावेळी ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला.

ध्वनीप्रक्षेपण यंत्रणेचा शुभारंभ

विभागीय क्रीडा संकुल समिती व जिल्हा खनिकर्म विभागाच्या निधीतून विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या ध्वनीप्रक्षेपण यंत्रणेचा शुभारंभ पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाला. सुमारे १५ लाख निधीतून ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती

मुख्य कार्यक्रमाला श्रीमती कमलताई गवई यांच्यासह शहरातील राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143