Maharashtra

संकटावर मात करून विकासाकडे वाटचाल – पालकमंत्री संजय राठोड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

यवतमाळ- अविरत प्रयत्न आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वराज्य मिळाले आहे. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. संकटाच्या काळात शासन, प्रशासन, सामाजिक संस्था तसेच नागरिकांच्या सहकार्याने ‘पुन:श्च हरीओम’ म्हणत राज्याचे आणि जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे विचार राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.पोस्टल ग्राऊंड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात अनेक विकासात्मक कामात जिल्हा अग्रेसर आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात २०२० खरीप हंगामाकरिता पात्र शेतकऱ्यांना १५७८ कोटी १२ लाखांचे खरीप पीक कर्ज वाटप (७३ टक्के) करण्यात आले आहे. कर्जवाटपात यवतमाळ जिल्हा अमरावती विभागात प्रथम स्थानी आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वात यावर्षी सर्वात जास्त पीक कर्जवाटप झाले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात जवळपास ८५३८५ शेतकऱ्यांच्या खाते कर्जमुक्त झाले असून जिल्ह्यातील बँकामार्फत ६२९ कोटी ४६ लक्ष रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. शासकीय कापूस खरेदी हंगाममध्ये जिल्ह्यात विक्रमी कापसाची खरेदी झाली असून यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

                              ‘मिशन उभारी’ अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात ३५ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रशासनाने लाभ दिला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे धान्य वाटपात यवतमाळ जिल्हा राज्यात तिसरा तर अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात ८ फेब्रुवारी २०२० पासून शिवभोजन थाळी सुरू झाली. शासनाने ३० मार्चपासून पाच रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली. या अंतर्गत जिल्ह्यात एकूण ६ लक्ष ६३ हजार १६९ शिवभोजन थाळ्यांचा लाभ देण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी जिल्ह्यामध्ये १७११४ कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहेत. नरेगाअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ५३५४५ कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यात ९९.६१ टक्के सातबारा डिजिटल स्वाक्षरी करण्यात आले आहे. जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये यवतमाळ जिल्ह्याने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली असून मतदार याद्यांच्या व्यवस्थापनासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले आहे. कृषी पंप वीज धारकाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरण – २०२० जाहीर केले आहे. यात ३० मीटर पर्यंत अंतरावरील कृषी ग्राहकास तात्काळ सर्व्हीस लाईनवर वीज जोडणी देण्यात येईल. कृषीपंपाच्या वीज बिलातही सवलत देण्यात येत असून त्यानुसार प्रथम वर्षी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम भरल्यास वीज बिल कोरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच सुधारीत थकबाकी भरण्यासाठी तीन वर्षांची सवलतसुध्दा देण्यात आली आहे. तसेच या पायाभुत सुविधासाठी राज्य शासन दरवर्षी १५०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक सार्वजनिक शौचालय बांधण्याचा मान यवतमाळ जिल्ह्याने पटकविला आहे. या कामाची दखल देशपातळीवरसुध्दा घेण्यात आली असून जलशक्ती मंत्रालयाकडून राबविण्यात आलेल्या सामुदायिक शौचालय अभियान २०२० अंतर्गत दारव्हा तालुक्यातील बोरी खुर्दु ग्रामपंचायतीने देशातून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील १२२६७ लाभार्थ्यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यावर शासनाकडून एकूण २९ कोटी ४८ लक्ष रुपये खर्च करण्यात आला आहे.

वर्षभरापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग तसेच इतर यंत्रणा कोरोनाविरुध्द अहोरात्र लढाई लढत आहे. कोरोनावर आता लस उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वेगवेगळ्या टप्प्यात ही लस संपूर्ण नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. आपले शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी तयार केलेली लस पूर्णपणे विश्वासार्ह व सुरक्षित आहे. लसीकरणाबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी ज्याप्रकारे शासन आणि प्रशासनाला सहकार्य केले, असेच सहकार्य लसीकरण मोहिमेतसुध्दा आवश्यक आहे. विशेष म्हणजे लस उपलब्ध झाली असली तरी शासन आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे नागरिकांनी पालन करावे. दैनंदिन मास्कचा वापर, सामाजिक अंतर ठेवणे, गर्दी टाळणे, वारंवार हात धुणे आदी बाबी गांभिर्याने पाळल्या तरच आपण कोरोनाला  हद्दपार करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीरनारी राधाबाई रामकृष्ण बोरीकर, मंगला देवचंद सोनवणे, नंदाबाई दादाराव पुराम, सुनीता प्रकाश विहिरे यांचा सन्मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत प्रथम आलेला तन्मय कैलास नागपाल, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील शीतल गजभिये, प्रणाली चंदनखेडे, राहूल पंडीत या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच जिल्‍हयातील महात्‍मा ज्‍योतिराव फुले जन आरोग्‍य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्‍य योजनेमध्‍ये उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शासकीय व खाजगी रुग्‍णालये यात डॉ.शेखर घोडेस्‍वार, श्री.वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्‍णालय, पुसद येथील मेडिकेअर मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्पिटल, लाइफ लाइन मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्पिटल, कॉटन सिटी मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्‍पीटल, दिग्रस येथील आरोग्‍यधाम हॉस्पिटल एंड क्रिटिकल केअर सेंटर, डॉ.निलेश येलनारे (चिंतामणी हॉस्‍पीटल), उमरखेड येथील सेवा स्‍पेशालिटी हॉस्पिटल, संजीवन मल्‍टीस्‍पेशालिटी, हॉस्पिटल,साई श्रध्‍दा मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्पिटल, दत्‍त हॉस्पिटल आदींचा समावेश होता. कोव्हीडमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. गिरीष जतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार,  खाजगी संस्था यात संजय राठोड मित्र परिवाराच्या वतीने पराग पिंगळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुध्दा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच यावेळी महाकृषी उर्जा अभियानांतर्गत संदीप फकीरचंद दुर्गे, शंकर पुनाजी गेडाम, अयुबखान सिकंदरखान पठाण, भवरीलाल रामदास पवार यांना डिमांड नोद देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे यांनी केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143