Economy

दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी साहित्य व साधनांचे नि:शुल्क वाटप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर- जिल्ह्यातील दिव्यांगांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी विविध साहित्य व साधनांची गरज असून, त्यांना परवडणाऱ्या दरात आणि वेळेत ते उपलब्ध होणे अवघड जाते, ही बाब लक्षात घेऊन महात्मा गांधी सेवा संघाद्वारा संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर तसेच भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई आणि मल्टी कम्युनिटी एक्सचेंज ऑफ इंडिया यांच्या सामाजिक दायित्त्वातून जिल्ह्यातील 153 दिव्यांग लाभार्थ्यांना सुमारे 10 लाख रुपये किमतीच्या साहित्याचे निःशुल्क वितरण आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व पदुममंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले.  शहरातील लक्ष्मीनगर येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सुनील केदार यांनी केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ. नितीन राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून जि. प. अध्यक्षा रश्मी बर्वे, नगरसेवक दिनेश यादव, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, डॉ. उदय बोधनकर, आणि भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबईचे शाखा प्रमुख एन. बी. व्यास आदी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र हे चांगले काम करत असून या कार्याचे त्यांनी कौतुक केले. दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही केदार यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील एकही दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन  त्यांनी केले. दिव्यांगांना समाजात दया आणि सहानुभूतीपेक्षा संधीची गरज आहे.  त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते त्याचे सोने करून आत्मनिर्भर होऊ शकतात, त्यासाठी विविध संधी  निर्माण करण्याची गरज असल्याचे मत डॉ.  राऊत यांनी मांडले. साहित्य-साधने वितरण कार्यक्रमात 27 दिव्यांगांना ट्रायसिकल, 42 व्यक्तींना क्रचेस आणि 54 व्यक्तींना व्हीलचेअर्सचे नि:शुल्क वाटप करण्यात आले. या शिबिरात जिल्ह्यातील 153 दिव्यांग आणि त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  देशमुख, यांनी तर आभार अभिजित राऊत यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मासोदकर यांनी केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143