Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मालेगाव- शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत पुढील काळात कृषी विभागाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. विकेल ते पिकेल या संकल्पनेतून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल विक्री करण्यासह त्यावर प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी ही काळाची गरज आहे. यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने समृध्द होईल असा विश्वास राज्याचे कृषी मंत्री यांनी दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील खडकी येथे माळमाथा कृषी विकास शेतकरी उत्पादक कंपनीचा शुभारंभ कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना मंत्री भुसे म्हणाले, खडकी येथे स्थापन करण्यात आलेल्या माळमाथा शेतकरी उत्पादक कंपनीचे नाव केवळ गावापुरता मर्यादित न ठेवता माळमाथा परिसरातील इतरही तरुण शेतकऱ्यांना सहभागी केल्यास या कंपनीचे मोठ्या वटवृक्षात रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या मालावर प्रकिया करण्याबरोबरच रोपवाटीका, बिज उत्पादन सारखे विविध उपक्रम राबवून ही कंपनी नावारुपाला आणण्यासाठी कृषी विभागामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. चाळीसगाव फाट्यावरील आदित्य कृषी एजन्सीच्या किसान सुविधा केंद्रामार्फत माती नमुना परिक्षण, संतुलित खत वापराबाबत मार्गदर्शन, बीज परिक्षण सेवा, पीक लागवड विषयक सल्ला, कृषी विस्तार कार्यक्रम आदि विनामुल्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विकेल ते पिकेल या संकल्पनेतून उदयास आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये तरूण शेतकऱ्यांचा सहभाग कौतुकास्पद असल्याचे सांगत विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ म्हणाले, जिल्हयात एकूण 210 नोंदणीकृत कंपन्या असून नव्याने स्थापन होणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेवून महत्वाकांक्षी उपक्रम म्हणून याकडे पहावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यापुढे शेतकरी हा कर्जमाफीच्या कुबड्या शिवाय उभा राहण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशिल असून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकास व विस्तारासाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कृषी विभाग कटिबध्द असल्याचेही ते यावेळी म्हणाले. प्रगतशिल शेतकऱ्यांच्या नवनवीन संकल्पना स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमास शिवदास वैद्य, भिमराव देवरे, दिलीप कळमकर, किरण चव्हाण, शोभाबाई दुधेकर, शरद भोयटे, प्रभाकर शेळके, समाधान जगताप आदि उपस्थित होते.
आदर्श ग्रामविकास योजनेतंर्गत तालुक्यातून खडकी गावाची निवड : मंत्री दादाजी भुसे
आदर्श ग्रामविकास योजनेतून प्रत्येक तालुक्यातून एका गावाची निवड करण्यात येणार असल्याने मालेगाव तालुक्यातून खडकी गावाच्या निवडीची घोषणा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज केली. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनातून खडकी गावाचा सर्वांगिण विकास साधणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. वारकरी संप्रदयाच्या या गावातील तरूणांनी साकारलेल्या अभ्यासीका तसेच लोकवर्गणीतून साकारण्यात आलेली शाळा असे सेवाभावी उपक्रम खडकी येथील गावकऱ्यांनी राबविल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, प्रकल्प उपसंचालक हेमंत काळे, शास्त्रज्ञ रामदास पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तंत्रअधिकारी गोकुळ अहिरे, पंचायत समिती कृषी अधिकारी किरण शिंदे, प्रमोद निकम, दिपक मालपुरे, शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष सागर चव्हाण, उपाध्यक्ष सचिन कळमकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143