FB IMG 1619349486393
Health Maharashtra Solapur City

सोलापूर शहरातील नादुरुस्त दवाखान्यासाठी पावणे चार कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

बेडची क्षमता 250 ने वाढणार पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरांमध्ये ऑक्सिजन बेड व इतर बेडची कमतरता भासू नये, यासाठी शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या नादुरुस्त दवाखाने दुरुस्तीसाठी पावणेचार कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या दवाखान्यामुळे 250 बेडची सोय होणार आहे.

नियोजन भवन येथे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि सोलापूर शहरातील कोविड-19 संबंधित उपाययोजनेबाबत आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, यशवंत माने, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह सभापती, गटनेते, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. सोलापूर शहरात ग्रामीण भागासह शेजारील जिल्ह्यासह कर्नाटकमधून कोरोनाचे रूग्ण उपचारासाठी येत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने आणि मनपाने योग्य नियोजन करणे महत्वाचे आहे. शहरातील महापालिकेचे बंद अवस्थेत असलेले दवाखाने दुरूस्ती करून त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहरात मनपा आयुक्तांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सामाजिक कामातून कोविड केअर सेंटर कोणी उभे करीत असतील तर त्यांना त्वरित मंजुरी द्यावी.
                   लोकसंख्येच्या प्रमाणात शहरात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ हॉस्पिटल, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटर याची तयारी प्रशासनाने त्वरित करावी. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून गरीब रूग्णांवर उपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. खाजगी रूग्णालये जादा बिलाची आकारणी करीत असतील तर पथकाद्वारे तपासणी करा. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. कोरोना पेशंटच्या नातेवाईकांना जेवणाची सोय त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रेमडेसीवीर इंजेक्शन दिलेल्या रूग्णांची नोंद ठेवा
रेमडेसीवीर इंजेक्शन गरज असेल त्याच रूग्णांना द्यावे, रूग्ण गंभीर नसेल तर नातेवाईकांनी उगाच इंजेक्शनचा आग्रह धरू नये. डॉक्टरांनी सरसकट सर्वांना रेमडेसीवीर इंजेक्शन न देता गरजूंना द्यावे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला जादा इंजेक्शन देण्याचे मान्य केले असून 30 एप्रिलपर्यंत तुटवडा कमी होईल. इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी रूग्णालयांनी इंजेक्शन दिलेल्या रूग्णांची नावे नोंदवहीत ठेवण्याचे निर्देशही भरणे यांनी दिले.

रूग्णालयांनी शासकीय दरपत्रक दर्शनी भागात लावावे
अनेक नातेवाईकांच्या जादा बील आकारण्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. खाजगी रूग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेला दर असेल ते दरपत्रक दवाखान्याच्या दर्शनी भागात लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी गेल्या चार दिवसांपासून ऑक्सिजनसाठी पाठपुरावा केला आहे. दोन दिवसात ऑक्सिजनचा तुटवडा जिल्ह्यातील रूग्णालयांना भासणार नाही. नागरिकांनी कोणताही आजार अंगावर काढू नये, त्वरित दवाखान्यात तपासणी करून उपचार घ्यावेत, जेणेकरून ऑक्सिजन लावावा लागणार नाही. जिल्ह्यात 9 ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचे नियोजन असल्याचे भरणे यांनी सांगितले.

जास्तीत जास्त लसीसाठी प्रयत्न
लसीचे योग्य नियोजन सुरू असून जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त लस मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. लसीकरण जास्तीत जास्त केले तर रूग्णसंख्या कमी करण्यास मदत होणार आहे. लसीकरण बूथवर विनाकारण गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही श्री. भरणे यांनी दिल्या. महापौर, आमदार, गटनेते, नगरसेवक यांनी विविध सूचना मांडल्या, सर्व सूचनांवर गांभिर्यपूर्वक विचार करून तयारी करण्याचे निर्देशही भरणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, लसीचा योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना 90 दिवसात लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 6.5 लाखांची लसीची मागणी असताना तीन लाख लसीच्या कुप्या प्राप्त झाल्या आहेत. ऑक्सिजनसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून रूग्ण वाढत असल्याने तुटवडा जाणवत आहे. 45 मेट्रीक टन ऑक्सिजनची मागणी असून 40 मेट्रीक टन रोज मिळत आहे. यामुळे जिल्ह्यात काही नवीन आणि बंद असलेले ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. निकषाप्रमाणे डॉक्टरांनी ऑक्सिजनचा वापर केल्यास बचत होणार आहे, याबाबत सर्वांना सूचना करण्यात आल्या आहेत. नागरिक, रूग्णांनी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि हात साबणाने धुणे, गर्दीत जाणे टाळले तर कोरोनाचा शिरकाव होणार नाही. सोलापूर शहरची कोरोना स्थिती आयुक्त शिवशंकर यांनी, दक्षिण सोलापूरची प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी तर उत्तर सोलापूरची स्थिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी मांडली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com