Solapur City News 59
Religious

विशाळगडावरील ‘रेहान बाबा’ दर्ग्याला शासकीय निधी; मंदिरे अन् बाजीप्रभूंच्या स्मारकांची मात्र पडझड

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

विशाळगडावर झालेली इस्लामी अतिक्रमणे हा छत्रपती शिवरायांचा अपमानच; अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार ! – सुनील घनवट
दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची मागणी
कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकोट हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहेत. तेथील विविध स्मारके ही पराक्रमाची साक्ष देणारी प्रेरणास्थाने आहेत. हिंदवी स्वराज्याचा वारसा असणार्‍या या गडकिल्ल्यांसाठी अनेक शूरवीर मावळ्यांनी रक्त सांडले. या गडकिल्ल्यांवर गेल्यावर आजही आपल्या पराक्रमी इतिहासाचा अभिमान वाटून उर भरून येते. अशांपैकीच एक असलेला म्हणजे विशाळगड ! 350 वर्षांनंतरही ऊन, वारा, पाऊस आणि मानवी आक्रमणे यांना तोंड देत आजही उभा आहे; मात्र शिवछत्रपतींचा हा अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरावस्थेत आहे. या गडावर 64 हून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. ज्या शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या पराकम्राची साक्ष या भूमीत आहे, त्यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या जीर्णोद्धारासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे, तेथे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता आहे, दर्ग्याचे आर्.सी.सी. बांधकाम झाले आहे. हा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. हे षड्यंत्र आम्ही कदापि सहन करणार नाही. विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणे ही छत्रपती शिवरायांचाच अपमान असून ही अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास याविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याची चेतावनी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ता सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी कृती समितीचे सदस्य  संभाजीराव भोकरे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), मलकापूर येथील  चारुदत्त पोतदार,  प्रमोद सावंत,  किशोर घाटगे, श्री. रमेश पडवळ, श्री. राजू यादव, कृती समितीचे समन्वयक  किरण दुसे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे तसेच हिंदु विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता समीर पटवर्धन हे ही उपस्थित होते.
या वेळी  घनवट म्हणाले की, शिवछत्रपतींच्या विशाळगडाच्या दुरावस्थेला कारणीभूत पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, तसेच गडावरील अतिक्रमणे एक महिन्यात हटवून दुर्लक्षित वीरपुरूषांची स्मारके आणि मंदिरे यांचा शासनाने जीर्णोद्धार करावा, अशा मागण्याही शिवशाहीचा आदर्श सांगणार्‍या राज्य शासनाकडे करत आहोत. विशाळगडाच्या दुरावस्थेची काही उदाहरणे पुढे देत आहोत.
१. गड आणि मंदिरे यांची दुरावस्था : श्रीवाघजाई मंदिर हे विशाळगड वासियांचे ग्रामदैवत आहे. या मंदिराच्या भिंती आता जमिनीपासून केवळ एक फूट शिल्लक असून मंदिरासमोरील एक नक्षीदार खांब आणि देवळात वाघावर स्वार असणारी वाघजाई देवीची मूर्ती भग्नावस्थेत आहे. यांसह विठ्ठल मंदिर, नृसिंह मंदिर, विठ्ठलाईदेवी मंदिर, श्रीराम मंदिर यांसह अनेक मंदिरांची आणि गड-तटबंदी यांची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. गडावर अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे.
२. बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीकडे दुर्लक्ष : स्वराज्यासाठी बलिदान देणार्‍या वीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे या नरवीरांच्या समाधीसाठी पुरातत्व विभागाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. शिवप्रेमींनी स्वखर्चाने समाधीवर छत बांधले. समाधीपर्यंत जाण्यासाठी पायवाटदेखील नाही. समाधीविषयी माहिती देणारा साधक फलकही लावलेला नाही.
३. विशाळगडावरील अतिक्रमण : 1998 या वर्षी हा गड पुरातत्व विभागाने स्वतःच्या नियंत्रणात घेतला. यानंतरही या गडावर मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे झालेली आहेत. या संदर्भात माहितीच्या अधिकारात वर्ष 1997-1998 आणि वर्ष 2015-16 ते 2018-19 या वर्षांच्या मिळकत कर आकारणीच्या सूचीमध्ये 200 चौरस फुटांपासून ते 2.5 गुठ्यांपर्यंत ही तफावत आढळते. अशी 100 हून अधिक अतिक्रमित बांधकामे गडावर झालेली आहेत. विशेष म्हणजे गड पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात असतांनाही नियम-कायदे धाब्यावर बसवून स्थानिक प्रशासनाने लोकांना या गडावर बेघर योजनेतून घरे बांधून दिली आहेत. त्या वेळी संमत केलेले क्षेत्रफळ 288 चौरस फूट होते; पण आता ते 1200 ते 2013 चौरस फूट वाढल्याचे दिसते. गडावर अशी अनेक बांधकामे असून सर्वच ठिकाणी त्यांचे क्षेत्रफळ वाढल्याचे दिसते. तसेच ‘इंदिरा आवास घरकुल योजने’अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचीही तीच अवस्था आहे. या संदर्भात माहितीच्या अधिकारात मिळालेल्या 27 जानेवारी 2016 च्या पत्रामध्ये ‘या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बांधकामे झाली आहेत’ असे पुरातत्व खात्याने मान्य केले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमणास ‘ग्रामपंचायत गजापूर विशाळगड’ यांच्याकडून बांधकामास देण्यात आलेली अनुमती अवैध असल्याचे नमूद केले आहे, तसेच ‘ही बांधकामे त्वरित काढून घ्यावीत’ असेही नमूद केले आहे आणि यापुढे परवानगी देण्यात येऊ नये, असे पत्र पुरातत्व विभागाने ग्रामपंचायत, कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि शाहूवाडी तहसीलदार यांना पाठवले आहे. 5 वर्षांनंतरही या गडावर झालेले अवैध बांधकाम तसेच आहे. उलट नवीन बांधकामेही होत आहे. यावर पुरातत्व खाते, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी कोणती कारवाई केली नाही. 15 वर्षांत कागदी घोडे नाचवण्याशिवाय पुरातत्व विभागाने काही केलेले नाही.
४. विशाळगडाचे होणारे इस्लामीकरण रोखणे अत्यंत आवश्यक !: विशाळगड येथे वर्ष 1997 पूर्वी असलेले मंदिर आणि मशिदी यांच्या असणार्‍या क्षेत्रफळ पाहिल्यास वर्ष 2015 नंतर काही ठिकाणी मंदिरांचे क्षेत्रफळ कमी झाले आहे, तर काही ठिकाणच्या मंदिरांच्या नोंदी दिसत नाहीत. एकीकडे मंदिरांची संख्या अल्प होत असून मशिदींची संख्या आणि क्षेत्रफळ वाढत असल्याचे दिसते. इतिहासकारांच्या मते स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आलेला सरदार ‘मलिक रेहान’ मारला गेला. त्याच्या नावाने (रेहानबाबा) येथे दरवर्षी उरूस भरवला जातो, तसेच रेहानबाबा नावाने मोठा आर्.सी.सी. दर्गा गडावर बांधण्यात आलेला आहे. त्याच्या दर्शनासाठी आणि नवस बोलण्यासाठी प्रतिदिन अनेक लोक येथे येतात. वाघजाई मंदिराच्या समोरच उजव्या हातास एक स्वच्छ पाण्याचा झरा आहे त्याठिकाणी घोड्याच्या टाप्याच्या आकाराचे नैसर्गिक चिन्ह आहे. पूर्वापार चालत आलेल्या हे चिन्ह एक हिंदु स्मारक असतांना यावर कट्टरतावाद्यांनी अतिक्रमण करून ते रेहानबाबाचे तीर्थ असल्याची खोटी माहिती पर्यटकांना दिली जात आहे.
या प्रकरणी आमच्या मागण्या
1. वर्ष 1998 पूर्वी ज्या नोंदी शासनाकडे आहेत, केवळ त्याच ग्राह्य धरून उर्वरित सर्व बांधकामे आणि अतिक्रमणे एका महिन्याच्या आत शासनाने काढून टाकावीत. या प्रकरणी आजपर्यंत विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरे-समाध्यांची दुरावस्था याला कारणीभूत असणार्‍या पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी. 
2. गडावरील अतिक्रमणे जोपर्यंत पूर्णपणे हटत नाहीत, तोपर्यंत पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी विशाळगडाला सप्ताहातून एकदा भेट द्यावी आणि तेथील अहवाल पारदर्शीपणे शासनाला सादर करावा.
3. पन्हाळा ते विशाळगड हा एकमेवाद्वितीय रणसंग्राम लोकांसमोर येण्यासाठी याचे एक ऐतिहासिक भव्य स्मारक उभारण्यात यावे. तसेच गडाच्या पायथ्यापासून गडाच्या टोकापर्यंत असणारी सर्व मंदिरे, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे यांचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावावेत.
4. गडाचे पावित्र्य भंग करणार्‍या गोष्टींवर (उदा. मद्यपान, मांसविक्री) तसेच आरोग्यास हानी पोचवणार्‍या सर्वच गोष्टींना प्रतिबंध करावा. पर्यटकांच्या गडावरील निवासव्यवस्थेमुळे अनेक अयोग्य गोष्टी होतात, त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सर्व पर्यटकांची निवासव्यवस्था गडाच्या पायथ्याशी करावी.
5. गडाची ग्रामदेवता असणार्‍या वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्यात यावा.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143