Maharashtra

हिंदी भाषेचा प्रचार प्रसार आपुलकीने करावा – राज्यपाल

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

‘नया ज्ञानोदय’, ‘व्यंग यात्रा’ व ‘हंस’ मासिकांना पुरस्कार प्रदान

मुंबई- हिंदी ही संपूर्ण देशाला तसेच हृदयांना जोडणारी भाषा आहे. भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, मोरिशस आदींसह अनेक देशातील लोकांना हिंदी भाषा सहजतेने समजते. हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसाराचे कार्य आपुलकीने करत ही भाषा वाढवली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. महात्मा गांधी यांनी १९४२ मध्ये स्थापन केलेल्या हिंदुस्तानी प्रचार सभेतर्फे दिले जाणारे ‘महात्मा गांधी हिंदी पत्रिका प्रकाशन पुरस्कार’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले. दिल्ली येथून प्रकाशित होणाऱ्या ‘नया ज्ञानोदय’ ला प्रथम पारितोषिक, ‘व्यंग यात्रा’ला द्वितीय तर ‘हंस’ या नियतकालिकाला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या देशभरातील ४६ हिंदी नियतकालिकांमधून ३ मासिकांची निवड करण्यात आली. राज्यपाल  कोश्यारी म्हणाले, इंग्रजी भाषा येणे ही काळाची गरज आहे, हे मान्य आहे. परंतु, लहान मुलांचे प्राथमिक शिक्षण हिंदी किंवा मराठी, बंगाली, यांसारख्या प्रादेशिक भाषेतून झालेले चांगले. सर्वांनी ‘स्वदेशी’, ‘स्वभाषा’ व ‘स्वसंस्कृती’च्या संवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महात्मा गांधी, स्वामी दयानंद यांचेसह देशाची सैन्यदले, विविध संस्था, संघटना व हिंदी चित्रपट सृष्टी यांचे हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसारासाठी अद्भुत योगदान आहे. हिंदी भाषेच्या विकासात उर्दू भाषेचे देखील मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. हिंदुस्तानी प्रचार सभेचे मानद सचिव फिरोज पैच यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी नया ज्ञानोदयचे संचालक मुदीत जैन, व्यंग-यात्राचे संस्थापक डॉ.प्रेम जनमेजय व हंसच्या संपादिका रचना यादव यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला सभेचे मानद कोषाध्यक्ष अरविंद देगवेकर, साहित्यिक मंजू लोढा, संचालक संजीव निगम तसेच हिंदी भाषिक साहित्यिक, लेखक व इतर मान्यवर उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143