Economy Maharashtra

महाराष्ट्रावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव ख्यातमनाम विचारवंत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य चळवळतील विविध महत्त्वाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या. राज्यातील थोर पुरुषांचा व संतांचा त्यांच्यावर प्रभाव होता तसाच महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रातील पुरोगामी नेतृत्वावर आहे, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तथा ख्यातनाम विचारवंत तुषार गांधी यांनी आज मांडले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे २०वे पुष्प गुंफताना महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ या विषयावर तुषार गांधी  बोलत होते. महात्मा गांधी यांनी मॅट्रिकचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले व इंग्लंडला बॅरिस्टरी करण्यासाठीही याच शहरातून ते परदेशात गेले. आपल्या वकिली व्यवसायाची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली. पुढे  वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून स्वातंत्र्य लढ्यातील विविध आंदोलनांची आखणी झाली व अनेक रचनात्मक कार्ये घडली. गोपाळकृष्ण गोखले हे त्यांचे राजकीय गुरुच होते तसेच संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम आदी संताच्या विचारांचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. महात्मा गांधींच्या  विचारांच्या मुशीत तयार झालेल्या नेत्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करत राज्याला दिशा दिली, असे तुषार गांधी यांनी सागितले. आफ्रिकेतून परत आल्यावर महात्मा गांधी यांचा जानेवारी १९१५ मध्ये महानायक म्हणून मुंबईतच सत्कार झाला. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिलीचा श्रीगणेशा केला. चंपारण्यच्या प्रसिद्ध सत्याग्रहानंतर गांधीजी गुजरातेतील साबरमती आश्रमात स्थायिक झाले पण याकाळातही महाराष्ट्रातून त्यांना सतत सहकार्य मिळत राहिले. विनोबा भावे,काकासाहेब कालेलकर, साने गुरुजी, दादा धर्माधिकारी आदी अनुयायी-सहकारी त्यांना महाराष्ट्रात मिळाले. मिठाच्या सत्याग्रहानंतर गांधीजींनी साबरमती आश्रम सेाडला व वर्धेतील सेवाग्राम आश्रमात स्थायिक झाले. येथूनच त्यांच्या रचनात्मक कार्यास सुरुवात झाली. या आश्रमातील वास्तव्यात गांधीजींच्या विचारांच्या मुशीत तयार झालेल्या व त्यांच्या कार्यप्रणालीत वाढलेल्या नेत्यांनी महाराष्ट्राला पुरोगामी नेतृत्व दिले.गांधींजींच्या विचारांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा व तत्वज्ञान मिळाले असे तुषार गांधी यांनी सांगितले. स्वातंत्र्य लढयासाठी देश-विदेशात फिरताना महात्मा गांधी मुंबईतूनच प्रयाण करायचे. तेव्हा त्यांचा मुक्काम गावदेवी भागातील मणिभवन येथील मित्राच्या घरी असायचा. महात्माजींच्या नेतृत्वातील भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे निर्णायक भारत छोडो आंदोलनही मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून झाले. पुण्याच्या आगाखान पॅलेस आणि येरवडा तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले होते. महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक दांडी मार्चमधील ८० स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा सहभाग होता. गांधीजी तुरुंगाला मंदीर तर तुरुंगवासाला तपश्चर्या मानत असत. काही अपवाद वगळता ब्रिटीशांनी गांधींजींना महाराष्ट्रातील तुरुंगातच ठेवले होते. तुरुंगातील वास्तव्यात त्यांनी संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम अशा महाराष्ट्रातील संतप्रभावळींच्या साहित्याचा अभ्यास केला. या संतांच्या विचारांचाही गांधीजींवर प्रभाव होता.त्यांच्या आश्रमाच्या प्रार्थनेत महाराष्ट्रातील संतांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते असे सांगून गांधीजी महाराष्ट्राकडून  प्रेरित झाले व महाराष्ट्राने गांधीजींच्या विचारातून प्रेरणा घेतल्याचे तुषार गांधी म्हणाले. महात्मा फुले, छत्रपती शाहू, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांनी महाराष्ट्राला प्रेम ,आदर आणि शांतीचा संदेश दिला आहे त्याचे कायम स्मरण ठेवून आचरण व्हावे, अशा भावनाही तुषार गांधी यांनी व्यक्त केल्या .

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143