Solapur City News 92
Maharashtra

शाहिरी परंपरेने प्रबोधन चळवळ जनमानसात नेली

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली-  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  केलेले समाजकार्य व राबविलेली प्रबोधन चळवळ समर्थपणे जनमाणसांपर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शाहिरी परंपरेने केले, असे मत प्रसिध्द शाहीर संभाजी भगत यांनी आज मांडले.  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे नववे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्राची शाहिरी परंपरा’ या विषयावर शाहीर भगत बोलत होते. मातृसत्ताक मुल्यातून १३ व्या शतकात झालेला शाहिरीचा उगम आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी शाहिरी पंरपरेचा केलेला प्रभावी वापर. पेशवाईत शाहिरीत झालेला बदल. पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ‘सत्यशोधक जलसे’ उभारून जनप्रबोधनाचे केलेले कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजक्रांतीसाठी उभारलेले सत्याग्रह व लढ्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सुरु केलेले ‘आंबेडकरी जलसे’, ‘लाल बावटा कलापथक’, ‘समाजवादी कलापथक’ ते संयुक्त महाराष्ट्राच्या चवळवळीत शाहिरीने प्राण फुंकुन केलेले प्रबोधन असा पटच शाहीर भगत यांनी यावेळी उलगडला.

              महाराष्ट्रातील शाहिरीचा उगम गोंधळातून झाल्याचे संशोधन आहे. तळागाळातून आलेल्या अवैदीक  मातृसत्ताक गायकांनीच शाहिरी हा गायन प्रकार या मातीत रुजवल्याचे शाहीर भगत म्हणाले.  १३ व्या शतकात शाहीरांची नावे आढळतात. त्यानंतर छत्रपती शिवाजी माहराजांनी ‘शाहीरी’ कलेला सजगपणे व सन्माने जगवले. त्याकाळात ‘शाहीर अगीनदास’ हे रणांगणातील चित्र लोकांसमोर मांडत त्यामुळे एका अर्थाने पत्रकारितेचे मुळही  शाहिरीत दिसते असे शाहीर भगत यांनी सांगितले. शिवाजी महाराजांनी अगीनदासाच्या शाहीचा गौरव म्हणून त्यांना सोन्याचे कडे दिल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. तळागाळातील लोकांना सोबत घेवून स्वराज्य स्थापन करणाऱ्‍या छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहीर, गोंधळी, भराडी, गारोडी अशांना सोबत घेतले व त्यांच्या कलेचा वापर हेरगिरीसाठीही  केला असे शाहीर भगत म्हणाले. पुढे पेशवाईमध्ये शाहिरीचा दरबारात वापर झालेला दिसतो, तसे पुरावे पेशवाईतील कागदपत्रात आढळतात. याच काळात शाहिरीत शृंगार रस आला. शृगांररसातील कवन शाहीर गात असत. पेशवाईत ५ शाहीर प्रसिध्द होते असा उल्लेख त्यांनी यावेळी केला. महात्मा फुले यांनी शाहिरीचा उपयोग समाज प्रबोधनासाठी केला. समाजातील विषमता, जातीची उतरंड यांना विरोध करण्यासाठी तसेच बहुजनांना शिक्षण, शेतकऱ्‍यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी व जनतेची लुट करणाऱ्‍यांविरोधात प्रबोधनासाठी महात्मा फुले यांनी  ‘सत्य शोधक जलसे’ उभारले. शेतकरी, अठरापगड जाती, यांचे होत असलेले शोषण व त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग याविषयी सत्यशोधक जलशांनी मोलाचे प्रबोधन केले.

आंदोलनासाठी  शाहिरीची परंपरा महात्मा फुलेंनी सुरु केली तशी आंबेडकरी चळवळीतही ती दिसून येते. ‘माझी दहा भाषणे आणि एका शाहीराचे सादरीकरण हे एकाच तोडीचे  आहे’ अशा शब्दात डॉ. आंबेडकरांनी शाहिरीचा गौरव केल्याचे शाहीर भगत म्हणाले. जन प्रबोधनासाठी डॉ. आंबेडकरांनी ‘आंबेडकरी जलशाची’ स्थापना केली. पुढे त्यांनी  १९२७ ला केलेला ‘चवदार तळ्याचा सत्याग्रह’ व त्याचा  संपूर्ण प्रचार व प्रसार गावो -गावात करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आंबेडकरी जलशांनी केले. डॉ.आंबेडकरांचे सर्व भाषणे जे लोक ऐकु शकत नव्हते त्यांच्या पर्यंत आंबेडकरी जलशांनी बाबासाहेबांच्या भाषणातील विचार गावागावत पोहचवले असे शाहीर भगत म्हणाले. कम्युनिष्ट पक्षाने १९३६ मध्ये ‘लालबावटा कला पथका’ची स्थापना करून उभारलेले कामगार लढे, समाजवादी कलापथकांनी केलेल कार्य,  काँग्रेस सेवादलाचे ‘कला पथक’, प्रतीसरकार आंदोलनातील शाहिरीचे योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला. संयुक्त महराष्ट्राच्या रत्यांवरील लढ्यात शाहीर अण्णाभाऊ साठे, अमरशेख, गवाणकर यांच्यासह आंबेडकरी शाहीरांचे मोलाचे योगदान असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी मांडले.  शाहीर विठ्ठल उमप, प्रल्हाद शिंदे आदींच्या कार्यावरही त्यांनी प्रकाश टाकला. राज्यातील  शाहिरी पंरपरेचा समृध्द वारसा पुढे घेवून जाण्यासाठी या कलेला लोकाश्रय मिळावा, असे आवाहन शाहीर भगत यांनी यावेळी केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143