Maharashtra Gov

राज्यात वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- संसर्गावरील उपचारांबरोबरच प्रतिबंधात्मक उपायांनी रोगावर मात केली जाऊ शकते हे दिसून येत असते. मात्र कोविडनंतर राज्यातील सामान्य नागरिकांचा वैद्यकीय सेवेवरील विश्वास वाढण्यास मदत होत आहे. येणाऱ्या काळात राज्यात वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीतर्फे 21 ते 24 जानेवारी 2021 दरम्यान सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या विषयावर एकूण 4 दिवसांची ऑनलाईन वर्ल्ड हेल्थ पार्लमेंट आयोजित केली आहे. त्यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख बोलत होते. देशमुख म्हणाले, जगभरात आता आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काळात गडचिरोली, उस्मानाबाद, सातारा, परभणी आणि जालना यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

                             आज कोविडवर लस जगभरात आली असून महाराष्ट्रात तर लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. मात्र जगभरात सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे नियम सारखेच पाळले गेले. त्यामुळेच येणाऱ्या काळातही आपण हे नियम नवीन जीवनशैली स्वीकारताना पाळणे आवश्यक आहे. 2020 हे वर्ष आपल्या सर्वांसाठी कठीण होते. मात्र 2021 हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच सकारात्मक ठरणार आहे कारण कोविड विषाणूवर लस आली असून पहिल्या टप्प्यात देशभरातील आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना लस दिली जात आहे.गेल्या वर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रासह जगभरात आलेल्या कोविड-19 विरुध्दच्या लढाईत सर्वांत मोठा वाटा हा डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, यांच्यासह सर्वच शासकीय यंत्रणांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही  देशमुख यांनी यावेळी सांगितले. खासदार डॉ. अंबुमणी रामदास यांनीसुध्दा चांगली आरोग्य यंत्रणा किंवा आरोग्य सुविधा उभारण्याबरोबरच आपल्या नागरिकांना येणाऱ्या काळात चांगल्या पायाभूत सुविधा, प्रदूषणमुक्त वातावरण देणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात सुदृढ आरोग्य यंत्रणा उभारण्यावर केंद्र आणि राज्य शासन भर देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या हेल्थ पार्लमेंटमध्ये बोलताना डॉ. ओक म्हणाले की, सध्या कोविड रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून आपल्याला सर्वांनीच न्यू नॉर्मल जीवनशैली स्वीकारताना येणाऱ्या काळात मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या गोष्टी पाळणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात आरोग्याला प्राधान्य देत असताना आपण सर्वांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याबरोबरच ऑनलाईन शिक्षणावर अधिकाधिक भर देणे आवश्यक आहे. देशभरातील आरोग्य सेवेत सुधारणा करणे, सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सुविधा वाजवी दरात उपलब्ध करण्यावर येणाऱ्या काळात कसा भर देणे आवश्यक आहे हाच या पार्लमेंटचा मुख्य विषय होता. पुण्यातील विश्वराज हॉस्पिटल, तळेगाव येथील माईर्समायमर वैद्यकीय महाविद्यालय आणि लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसांचे वर्ल्ड हेल्थ पार्लमेंट भरविले गेले आहे. आज सकाळी या पार्लमेंटचे ऑनलाईन उद्घाटन झाले. एमआयटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड यांनी या पार्लमेंटचे आयोजन केले आहे. सिक्कीमचे आरोग्यमंत्री डॉ. मणिकुमार शर्मा, जम्मू काश्मीरच्या आरोग्यमंत्री असिया नक्काश, खासदार डॉ.अंबुमणी रामदास, खासदार डॉ. सुभाष भामरे, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, महाराष्ट्राच्या कोविड-19 टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. आदिती कराड यावेळी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143