Economy

पुनरूत्थान समरसता गुरूकुलम् संस्थेच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने त्वरित कार्यवाही करावी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेल्या क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित पुनरूत्थान समरसता गुरूकुलम् या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगिण विकास प्रकल्पाच्या क्षेत्राला किमान करनिर्धारणा देण्यासंदर्भात तसेच अन्य मागण्यांसंदर्भात नियमानुसार सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित शैक्षणिक, सामाजिक विकास प्रकल्पाच्या बांधकामास परवानगी देण्यासंदर्भात समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी दिलेल्या निवेदनासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे बैठक झाली. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर,  नगरविकास विभागाचे उप सचिव, मोघे, ॲड.सतीश गोरडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

                चिंचवड येथील क्रांतीवीर चाफेकर स्मारक समिती संचलित सर्व शैक्षणिक, सामाजिक प्रकल्पांतर्गत 3 हजार मुले शिक्षण घेत असून क्रांतीवीर चाफेकर विद्यामंदिर व क्रांतीवीर चाफेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी 1 ली ते 12 वी पर्यंत शिक्षण देणारी सामाजिक शैक्षणिक संस्था चिंचवड गावठाणालगत आहे. ही जमीन चाफेकर स्मारक समितीच्या मालकीची असून या जागेचा गावठाणामध्ये समावेश करण्याची शक्यता पडताळावी. पवना नदीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पूल बांधण्याचे काम सुरू झाले  आहे. या पुलाच्या बांधकामासाठी संस्थेच्या दोन्ही मुख्य जुन्या इमारती पाडाव्या लागणार आहेत. यामुळे होणारी नुकसान भरपाई व इमारत बांधण्यास परवानगी द्यावी. गावठाणालगतच्या जमिनीचा समावेश गावठाणात केल्यास संस्था याठिकाणी बांधकाम करू शकेल. या शाळांचा सामाजिक प्रकल्पासाठी नियमानुसार चिंचवड गावठाणात समावेश करावा असे निवेदन क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष प्रभुणे यांनी सादर केले. उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, फासेपारधी तसेच भटक्या विमुक्तांची, कौशल्यावर आधारित निवासी शाळा नामवंतांनी गौरविली असून याबाबत शासनस्तरावर दखल घेण्यात आली आहे. नियमानुसार संस्थेला करमाफी देण्यासंदर्भात विहित पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. पूल बांधण्याचे काम सुरू असल्याने संस्थेच्या इमारतीची होणारी नुकसान भरपाई संस्थेला देऊन इमारतीचे नवीन बांधकाम करण्यास नियमानुसार परवानगी देण्यात यावी. शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी काही सोयी-सुविधा उपलब्ध करून देता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत तसेच जलसंपदा विभागाशी चर्चा करून पूर नियंत्रण रेषेबाबत बांधकामास येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कार्यवाही करावी. गावठाणालगतची जागा गावठाणामध्ये घेण्यासंदर्भात महसूल विभागाशी चर्चा करून नियमानुसार त्वरित कार्यवाही करावी, अशा सूचना उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143