मुंबई- कोरोनाच्या संकटात औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्याच दरम्यान आता मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने या बनावट औषधांच्या साठ्याची किंमत तब्बल 1.54 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त आणि परिणामकारक असलेल्या Favipiravir औषधांच्या गोळ्यांचा बनावट साठा मुंबईत विक्री होत असल्याची गोपनीय माहिती एफडीएला मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यावर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केली.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील शिवसृष्टी सर्जीमेड, गोरेगाव, मेडिटेब वर्ल्डवाईड, कांदिवली आणि निरव ट्रेडलिंक मुंबई या तीन औषध विक्रेकत्यांवर धाड टाकून Favipiravir Tablets आणि Hydroxy Chloroquin औषधांचा बनावट साठा जप्त केला. संदर्भात अधिक तपास केला असता असे समोर आले की, मे मॅक्स रिलीफ हेल्थकेअर, सोलन, हिमाचल प्रदेश ही उत्पादन संस्था अस्थित्वातच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या प्रकरणी समता नगर, कांदिवली आणि गोरेगाव पूर्व पोलीस ठाण्यात औषध निरीक्षकांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. तसेच मॅक्स रिलीफ हेल्थकेअरचे मालक सुदीप मुखर्जी यांना पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.