Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सी.बी.आय.ने गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध ठिकाणांची झाडाझडती घेण्यास सी.बी.आय.ने सुरुवात केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. बज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी मे.सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मे.मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सी.बी.आय.ला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर सी.बी.आय.ने प्रकरणाचा तपास सुरू केला होता. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाप्रकरणी सी.बी.आय.ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह या प्रकरणातील संबंधित इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही ठिकाणी सी.बी.आय.कडून झाडाझडतीही सुरू करण्यात आली आहे.
#solapurcitynews