Solapur City News 76
Maharashtra

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक पुनर्रचनेतून समाजपरिवर्तनाला दिशा दिली

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली- समाजव्यवस्थेने घालून दिलेली जातीची उतरंड, विषमता व भेदाभेद मोडून काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक पुनर्रचनेची संकल्पना मांडून वंचित समाजाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करत समाज परिवर्तनाला दिशा दिली, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे यांनी आज मांडले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक परिवर्तनाची दिशा   या विषयावर 27 वे पुष्प गुंफताना डांगळे बोलत होते. सामाजिक व्यवस्थेने सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेपासून वंचित ठेवलेल्या व डोक्यावर हक्काचे छप्पर नसलेल्या, राहायला हक्काची जमीन नसलेल्या घटाकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमानाची व हक्काची जाणीव करून दिली. या वंचित उपेक्षित घटकाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी व स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी सामाजिक पुनर्रचनेची  संकल्पना मांडली व ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक लढे उभारल्याचे डांगळे यांनी सांगितले. डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक पुनर्रचनेच्या लढ्यांमध्ये १९२७ चा रायगड जिल्ह्यातील महाड येथील ‘चवदार तळ्याचा सत्याग्रह’, १९३० मध्ये नाशिक येथील ‘काळाराम मंदिर’ प्रवेश असे एकानेक लढे आहेत.  वंचिताना स्वावलंबी जीवन मिळवून देण्यासाठी १९२४ मध्ये ‘बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापन करून त्यांनी ‘ शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा’ असा मंत्र दिला. जुन्या चालीरिती, रुढींचा त्याग करून स्वावलंबी शिक्षण घेवून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा संदेश त्यांनी दिला. अशा समाज घटकांसाठी शिक्षणाची दारे उघडी खुली व्हावी म्हणून पिपल्स एज्युकेश सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालय तर औरंगाबाद येथे मिलींद महाविद्‌यालयाची स्थापना केली. डॉ. आंबेडकरांचा दृष्टीकोण व्यापक होता दलितोध्दारासोबतच कामगार मंत्री असताना त्यांनी कामगारांचा आठ तासाचा दिवस ठरवून देण्याचे तसेच महिलांना बाळंतपणाची रजा मिळवून देण्याचे प्रयत्न केले. सर्वांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी  त्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली. शेतीकऱ्यांना पूरक व्यवसाय उपलब्ध करून देण्याचा विचार तसेच जल व्यवस्थापनाबाबतही त्यांनी महत्त्वाचे विचार मांडले, अशी माहिती डांगळे यांनी दिली.

                समाजशास्त्रज्ञ, शिक्षण शास्त्रज्ञ, समाजसुधारक, विद्वान पंडित, राजकारणी असे विविध पैलु डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तीमत्वाला होते. समाजातील शेवटच्या घटकाला स्वावलंबीपणे जगता यावे म्हणून त्यांनी समता बंधुता स्वातंत्र यावर आधारित जीवनमुल्य पध्दती अंमलात आणण्यासाठी त्यांनी अथक संघर्ष केला.  या सर्व विषयांवर डॉ. आंबेडकरांनी  लिखाण केले. ‘एनिहिलेशन ऑफ कास्ट’ या ग्रंथातून त्यांनी भारतातील धर्मव्यवस्थेचे विश्लेषण केले. ‘प्राब्लेम ऑफ रुपी’, ‘बुध्द अँड  हिज धम्म’, ‘रानडे, गांधी आणि जीना’ असे ग्रंथ लिहून त्यांनी भारतीय लोकशाही व सुधारणावादाची पंरपरा सांगितली. ‘कास्ट इन इंडिया’ या निबंधात त्यांनी देशातील जाती व्यवस्थेची मिमांसा केली असे डांगळे यांनी सांगितले. सर्वांसाठी शिक्षण या महात्मा फुले यांच्या विचाराला त्यांनी गती दिली. छत्रपती शाहु महाराजांनी १९२० च्या मानगाव परिषदेत डॉ. आंबेडकरांना पाठिंबा दिला होता. पुढे  त्यांनी फुले-शाहुंच्या विचारांची पंरपरा मजबूत केली. जनतेच्या प्रबोधनासाठी राजकीय पक्ष, संघटना उभारल्या, वृत्तपत्रे सुरु केली ब्रिटीशांनी १९३८ मध्ये आणलेल्या कामगार विरोधी काळ्या कायद्याविरुध्द ते रस्त्यावर उतरले. ‘स्वतंत्र मजूर पक्ष’, ‘शेड्युलकास्ट फेडरेशन’ आणि ‘रिपब्लिकन पक्षा’ची स्थापना करून त्यांनी मोठे कार्य उभे केले. ‘मुकनायक’ ‘जनता’ ‘बहिष्कृत भारत’आदी वृत्तपत्रांतून त्यांनी जनतेचे प्रबोधन केले व जुन्या चालीरी सोडून देत आधुनिक मुल्यांचा स्वीकार करण्याची शिकवण दिली, असे डांगळे म्हणाले. तत्कालीन व्द‍िभाषिक मुंबई राज्य जावून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावे यासाठी लढा उभारण्याबाबत विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांची भेट घेतली होती. या भेटीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला डॉ. आंबेडकरांनी पाठिंबा दर्शविण्याची भूमिका स्पष्ट केली होती. तसेच या लढयासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहनही केले होते, असे डांगळे यांनी सांगितले.

भारतीय राज्यघटना ; राष्ट्रभक्तीचे प्रतिक

बाबासाहेबांनी भारत देशाला दिलेली राज्यघटना हे राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीचे प्रतिक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र, समता-बंधुता’ या मुल्यांचा अंतर्भाव करून समाजातील शेवटच्या घटकाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळावा यासाठी  त्यांनी राज्यघटनेत अनेक तरतुदी करून ठेवल्या. बाबासाहेबांचे राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न आणि त्यांना अपेक्षित असलेला भारत राज्यघटनेतून दिसून येतो असे डांगळे म्हणाले.एकजातीय पध्दतीवर आधारित राजकीयपक्ष डॉ.आंबेडकरांना नको होता म्हणून लोकशाही टिकविण्यासाठी त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेवून ‘रिपब्लीकन पक्ष’ स्थापन केला. या पक्षाच्या माध्यमातून लोकशाही टिकविण्यासाठी सामाजिक न्यायाची लढाई लढली. त्यांनी आधुनिक मुल्यांशी सुसंगत असा ‘बौध्द धम्म’ स्वीकारला होता. आधुनिक विचाराचे अधिष्ठान असणारा, विज्ञान निष्ठा मानणारा व स्त्रियांना समानता देणारा एक समाधिष्टीत धम्म त्यांनी पुढे आणला. डॉ आंबेडकरांनी अनिष्ट प्रथांवर प्रहार केले व देशावर प्रेम केले शेवटच्या मानसाला न्याय मिळावा यासाठी ते सदैव प्रयत्नरत राहील. लोकशाहीचे सामाजिकीकरण करून सर्वसमान्यांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आचरणात आणणे व ते पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे हीच बाबासाहेबांना आदरांजली ठरेल, असे आवाहनही डांगळे यांनी केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143