Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
शिर्डी- श्रीरामपूर तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज श्रीरामपूर येथे केले. श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपुजन समारंभ ग्रामविकास, महसूल, विशेष सहाय्य बंदरे व खार जमिनी विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत येथील पंचायत समिती आवारात आज पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, कोरोना संकटकाळात राज्य शासनाने नियोजनबद्धरितीने काम करुन कोरोना नियंत्रणात आणला आहे. राज्य हळूहळू पूर्वपदावर येत असून विकास कामांना सुरुवात झाली आहे. श्रीरामपूर शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामाचा आढावा घेण्यात येऊन ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ते म्हणाले. शेती महामंडळाची जमीन खंडकरी शेतकऱ्यांसह ग्रामपंचायत आणि घरकुल, निवासासाठी देण्यात येईल. यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. श्रीरामपूर वासियांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार सदाशिव लोखंडे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने श्रीरामपूर परिसराचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. खंडकरी शेतकर्यांच्या जमिनी संदर्भातील प्रश्न बर्याच वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगून तो तातडीने सोडवावा अशी मागणी केली. अकारी पडीत शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात अशी सूचना यावेळी त्यांनी केली. माजी आमदार सर्वश्री बाळासाहेब मुरकुटे आणि भाऊसाहेब कांबळे यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. ग्राम विकास राज्यमंत्र्यांच्या हस्ते महसूल, ग्राम विकास तसेच आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसभापती बाळासाहेब तोरणे यांनी केले.
कार्यक्रमाला आमदार राधाकृष्ण विखे पाटील समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, पंचायत समिती सभापती संगिता शिंदे, सभापती शरद नवले, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते. पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143