Maharashtra

कालबद्ध मोहिमेमुळे प्रकल्पग्रस्तांचे वर्षानुवर्षांचे प्रश्न मार्गी लागण्यात यश

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सांगली – सांगली जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी कालबद्ध मोहीम राबविल्याने प्रकल्पग्रस्तांचे अनेक कठीण प्रश्न मार्गी लागले आहेत. ही मोहीम राबविली नसती तर कदाचित आणखी काही वर्षे या प्रश्नांचा निपटारा होऊ शकला नसता. या मोहिमेच्या निमित्ताने महसूल, कृषि, नगररचना, भूमिअभिलेख आदि अनुषंगिक विभागाच्या अत्यंत चांगल्या कार्याचा प्रत्यय आला आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे प्रकल्पग्रसतांचे प्रश्नांची सोडवणूक करून अधिकाऱ्यांनी पुण्य मिळविले आहे. प्रकल्पग्रसतांचा आशीर्वाद त्यांना नक्कीच लाभेल असे गौरवपूर्ण प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. इस्लामपूर येथील माणकेश्वर मल्टिपर्पज हॉल येथे सांगली जिल्ह्यातील वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींची सोडवणूकीबाबत अपेक्षापूर्ती व फलनिष्पत्ती समारंभात पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, उपवनसंरक्षक प्रमोद धानके, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय अधिकारी सर्वश्री नागेश पाटील, समीर शिंगटे, तहसिलदार सर्वश्री रविंद्र सबनिस, गणेश शिंदे, तेजस्विनी पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्नरत होतो. सांगली जिल्ह्याचे पालकत्व स्विकारल्याबरोबर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला कालबध्द मोहिम आखण्याचे आवाहन केले. याला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्यासह सर्व संबंधित यंत्रणेने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत संवेदनशिलपणे प्रकल्पग्रस्तांना गाववार भेटी देवून त्यांच्या प्रश्नांचा जागेवर निपटारा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांमध्ये दोन पिढ्यांचे तारूण्य गेले आहे. ही मोहिम हाती घेतली नसती तर आणखी काही वर्षे हे प्रश्न कदाचित प्रलंबितच राहिले असते. या मोहिमेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या अनेक महत्वाच्या प्रश्नांचा निपटारा झाल्याचे समाधान आज आपल्याला लाभले आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर किती मोठा बदल होऊ शकतो याचे ही मोहीम म्हणजे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जमीन वाटपामध्ये ज्यांना क्षारपड जमीन मिळाली आहे त्यांना जलसंपदा विभागातर्फे जमीन सुधार योजनेंतर्गत क्षार निचरा करून मिळेल, असे सांगून जनगणनेनंतर धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेल्या ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात येतील त्यामुळे त्यांच्या विकासाला अधिक गती येईल. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागात प्रकल्पग्रस्तांसाठी असणारा 5 टक्क्याचा अनुशेष वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143