Covid 19

कोविड लसीकरण मोहिमेत नोंदणीकृत लाभार्थ्यांनी लस घ्यावी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

बुलडाणा-  जिल्ह्यामध्ये कोविड १९ प्रतिबंधात्मक उपायोजना अंतर्गत कोविड १९ तपासणी,  रुग्णावर उपचार करणे व कोविड १९ विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये याकरिता त्रिसुत्री म्हणजे मास्क लावणे, वारंवार साबणाने हात धुणे व सामाजिक दुरी ठेवणे यामुळे जिल्ह्यामध्ये कोविड १९ विषाणूचा प्रादूर्भाव नियंत्रणामध्ये ठेवण्यात यश आले. परंतु कोविड १९ विषाणूचा नायनाट करणे हे आपले ध्येय आहे. त्या दुष्टीने जिल्ह्यामध्ये कोविशिल्ड लसीचे लसीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेत नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. तरी टप्प्याटप्प्यानुसार नोंदणीकृत लाभार्थ्यांनी लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते. पहिल्या फेरीमध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थेमध्ये कार्यरत मनुष्यबळ यांना लसीकरण करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये लसीकरण सत्रामध्ये को विन ॲपवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या नोंदणीची पडताळणी करण्यासाठी प्रतिक्षा कक्ष,  प्रत्यक्षात लस देण्यासाठी लसीकरण कक्ष  व लसीकरणानंतर 30 मिनीटे थांबण्यासाठी निरीक्षण कक्ष अशा त्रिस्तरीय रचनेमध्ये  लसीकरण केंद्र असणार आहे.

                             लसीसाठी नोंदणीकृत लाभार्थ्याच्या मोबाईल क्रमांकावर लसीकरणाची तारिख, वेळ व ठिकाणचा एसएमएस पाठविला जाणार आहे.  त्यानंतर सदर लाभार्थ्याच्या  नोंदीची खात्री लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे. त्यानंतर ओळखीचा पुरावा तपासून नंतर प्रत्यक्ष लस देण्यात येणार आहे.  जिल्ह्यात १९ हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. या लसीकरणाचे उद्घाटन 16 जानेवारी रोजी जिल्ह्यात जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा, सामान्य रूग्णालय खामगांव, ग्रामीण रूग्णालय दे. राजा, उपजिल्हा रूग्णालय मलकापूर, शेगांव व चिखली येथे या सहा ठिकाणी लसीकरणाला सुरूवात होणार आहे. लस ही उजव्या दंडाच्या वरील बाजूस देण्यात येणार आहे. लसीचे इंजेक्शन हे ऑटो डिजीबल आहे. त्यामुळे एका इंजेक्शनने एकाच व्यक्तीला लस दिली जाईल. पहिली लस दिल्यानंतर दुसरी लस २८ दिवसानंतर देण्यात येणार आहे. दुसऱ्या डोससाठीही लाभार्थ्यांना एसएमएस पाठविण्यात येणार आहे. दुसऱ्या डोसनंतर १५ दिवसांनी कोविड आजाराशी लढण्यासाठी प्रति पिंड शरीरात तयार होणार आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतर कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर व हात धुणे किंवा सॅनीटाईज करणे या त्रिसुत्रींचा अवलंब करावा लागणार आहे. जिल्ह्यामध्ये एकूण ६४६ आरोग्य संस्थामध्ये १३९६० डॉक्टर व आरोग्य सेविका आरोग्य कर्मचारी यांना पहिल्या फेरीमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणानंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास त्वरित रूग्णवाहिकेद्वारे संबंधीत शासकीय किंवा खाजगी रूग्णालयात उपचाराची सुविधा असणार आहे.

 अफवा पसरविल्यास गुन्हा दाखल करणार

लसीकरणादरम्यान कुणीही सोशल मिडीयावर अफवा पसरविली, खोट्या बातम्या किंवा जाणुन बुजून लसीची नकारात्मकता असणाऱ्या पोस्ट व्हायरल केलया तर, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे कोविड लसीकरणादरम्यान कुणीही सोशल मिडीयावर आलेल्या पोस्ट खात्री न करता फॉरवर्ड किंवा पसरवू नये. लसीकरण हे राष्ट्रीय कार्य आहे, या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143